Thu, Jul 16, 2020 00:23होमपेज › Solapur › 15 वर्षांच्या सत्तेमुळे राष्ट्रवादीत गटबाजी

15 वर्षांच्या सत्तेमुळे राष्ट्रवादीत गटबाजी

Published On: Dec 20 2018 1:26AM | Last Updated: Dec 19 2018 10:59PM
सोलापूर : प्रतिनिधी

सलग 15 वर्षे केंद्र व राज्याच्या सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोलापूर आणि इतरही जिल्ह्यांत पक्षांतर्गत गटबाजी वाढली असल्याचे  शरद पवारांचे नातू व इंडियन शुगर मिलचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सोलापुरात स्पष्ट केले. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या वक्तव्याला किंमत नाही. पुढील वर्षी राज्यात साखर, को-जनरेशेन, इथेनॉलचे उत्पादन कमी होईल. भाजपला ग्रामीण अर्थकारण कळत नसल्याचाही टोला पवार यांनी लगावला.

कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौर्‍यावर आलेले रोहित पवार पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सुभाष गुळवे, प्रशांत बाबर, आनंद मुस्तारे, महेश निकंबे आदी उपस्थित होते.

सोलापुरातच नव्हे तर इतरही जिल्ह्यांत पक्षांतर्गत वाद
सलग 15 वर्षे राष्ट्रवादी सत्तेत होती म्हणूनच पक्षांतर्गत गटबाजी वाढली. भविष्याच्यादृष्टीने संघटना स्ट्राँग झाली पाहिजे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांसोबतच अजित  पवारांचे स्नेह असल्याबाबत ते म्हणाले की, कोणी पक्ष सोडला असला तरी नाते संपत नाही. काका-पुतण्या, भावाभावांत वाद असतात, पण ते सणावाराला एकत्र जेवतात. त्यामुळे वाद कमी झाला असे नाही आणि वाढणार नाही असेही होत नाही. पक्षांतर्गत गटबाजी थांबली पाहिजे.

अजितदादा का चिडतात हे समजून घेतले पाहिजे
शरद पवारांचे राजकारण संयमी, तर अजित पवारांचे आक्रमक व रागीट असल्याबाबत रोहित पवार म्हणाले, अजितदादा का चिडतात हे समजून घेतले पाहिजे. त्यांना खोटे बोललेले सहन होत नाही, पण प्रशासनावर त्यांचा वचक चांगला. उजनीबद्दलच्या वक्तव्याची चर्चा झाली, पण उजनीत पाणीच नसेल तर जनतेचे जीवन कसे याबाबत दादांची तळमळ समजली नाही. 

कृष्णा-भीमा स्थिरीकरणाला विरोध नव्हता, पण टाटाला वीजनिर्मितीसाठी दिले जाणारे 28 टीएमसी पाणी उजनीत सहज येऊ शकते हा निर्णय महत्त्वाचा. मुख्यमंत्र्यांनी यासाठी समिती नियुक्त केली, पण अद्याप निर्णय नाही. या शासनाने अशा अनेक समित्या नियुक्त केल्या, पण पुढे काहीच होत नाही.

रामदास आठवलेंच्या वक्तव्याला किंमत नाही
अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याबाबतच्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या वक्तव्याला किंमत नसल्याचे सांगताना रोहित पवार म्हणाले, भाजपचे मंत्री व पदाधिकारी बेताल वक्तव्य करतात, पण त्यांनी दिलेले शब्द ते पाळत नसल्याने त्यांच्या वक्तव्याला किंमत नाही. पंढपुरात सैनिकांबद्दल घाणेरडे वक्तव्य करण्यात आले. मंत्री सदाभाऊ खोत, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेकजण बेताल वक्तव्य करतात.

राज ठाकरेंचे स्वागतच
मनसेचे राज ठाकरे लोकांच्या बाजूने आणि सरकारविरेधात बोलतात. कारण त्यांना हे सरकार काय करते ते समजले आहे. सरकारविरोधात ते बोलत असल्याने एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे स्वागत करतो, असे रोहित पवार म्हणाले.

ज्येष्ठांनी सांगितल्यास निवडणूक लढविणार
बारामती मतदारसंघातून अजितदादाच निवडणूक लढविणार हे अंतिम आहे. याबाबत चर्चाच का होते हे मला कळत नाही, असे रोहित पवार म्हणाले. कार्यकर्ता म्हणून काम करायचे आणि पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार आमदार निवडून आणायचे हे काम करेन. ज्येष्ठ, वरिष्ठांनी सांगितले तर निवडणूकदेखील लढवेन असे रोहित पवार म्हणाले.

मराठा आरक्षण टिकले पाहिजे
मराठा आरक्षणाचा निर्णय चांगला, पण ते टिकले पाहिजे आणि मराठा समाजाला लाभ झाला पाहिजे. पहिले 52 टक्के आरक्षण वगळता उर्वरित 48 टक्क्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असून फक्त 7 ते 8 जागाच आरक्षणास वाट्याला येतात. मराठा-ओबीसीसह इतर जातीत वाद लावण्याचा प्रकार होत असल्याची शंका असल्याचेही ते म्हणाले.

संभाजी ब्रिगेड व ताराराणी प्रतिष्ठानतर्फे स्वागत
 इंडियन शुगर मिलचे अध्यक्ष रोहित पवार यांचे सोलापुरात आल्यानंतर संभाजी ब्रिगेड व ताराराणी प्रतिष्ठानकडून स्वागत करण्यात आले. यावेळी विठ्ठल बळप, राजू घोडके, राहुल बोम्मा, गोरख गायकवाड, आरती हुल्ले, वैष्णवी कबाडे, प्रतिभा रच्चा आदी उपस्थित होते.