Sun, Dec 08, 2019 16:32होमपेज › Solapur › तीन हजार कोटी रुपयांची विक्रमी ‘एफआरपी’ वसूल

तीन हजार कोटी रुपयांची विक्रमी ‘एफआरपी’ वसूल

Published On: Aug 14 2019 12:09AM | Last Updated: Aug 14 2019 12:09AM
सोलापूर : संदीप येरवडे 

जिल्ह्यातील 31 साखर कारखानदारांकडून चालू व थकीत मिळून एकूण तब्बल 3 हजार 394 कोटी 18 लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली असून केवळ 7 टक्के ‘एफआरपी’ रकमेची  वसुली होणे बाकी आहे. महसूल व सहकार खात्याचा तगादा, कारवाईची टांगती तलवार आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कारखानादारांकडून दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात चालू असलेले 31 साखर कारखाने असून 11 सहकारी व खासगी 20 साखर कारखाने आहेत. सरकारने कारखान्यांना ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर देण्याचे बंधनकारक केले आहे. परंतु, या कारखान्यांना ऊस घालणार्‍या शेतकर्‍यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर मिळत नसल्याची कायमची ओरड असते. साखर कारखानदारांकडून ‘एफआरपी’ची वसुली होत नाही. उसाचे गाळप झाले की 14 दिवसांच्या आत ‘एफआरपी’ची रक्‍कम साखर कारखानदारांना देणे बंधनकारक असतानाही कारखानदार शेतकर्‍यांची ‘एफआरपी’ची रक्‍कम देत नाहीत.     

याबाबत जिल्ह्यातील शेतकरी संघटनांसह अनेक शेतकर्‍यांनी अनेक तीव्र आंदोनलेही केली आहेत.  केंद्र व राज्यातील सरकारने सातत्याने साखर कारखान्यांना सहकार्य व मदतीचा हात पुढे केल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ‘एफआरपी’ प्रमाणे दर मिळत नसल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले. बहुतांशी साखर कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकीत रक्‍कम मोठी असूनही कारवाई होत नसल्याचे चित्र होते. प्रशासनाने यावेळी मनावर घेतल्यामुळे ही विक्रमी वसुली झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडील साखरेला उठाव नसल्यामुळे कारखान्यात साखर तशीच पडून असल्याची   कारखादारांची ओरड होती. त्यामुळे शेतकर्‍यांची ‘एफआरपी’ची रक्‍कम कशी द्यायची,  असा प्रश्‍न कारखानदारांपुढे होता.

साखर कारखानदारांची समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने  साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन दिले. शासनाने या लोनच्या माध्यमातून थकीत ‘एफआरपी’ची रक्‍कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा केली आहे.   शेतकर्‍यांना उसाचा पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी साखरेचा विक्री दर प्रति क्‍विंटल 3100 रुपये करण्यात आला.  साखर कारखान्याची धुराडी सध्या बंद झाली असली तरी अद्याप जिल्ह्यातील 23 साखर कारखानदारांकडे  252 कोटी रुपयांची एफआरपीची रक्‍कम थकीत आहे. ही थकबाकीची आकडेवारी 31 जुलैअखेरची आहे.  आणखी काही साखर कारखानदारांकडून वसुली चालू आहे.  8 साखर कारखान्यांनी 100 टक्के ‘एफआरपी’ची रक्‍कम शेतकर्‍यांना दिली आहे.   ज्या साखर कारखान्याने शेतकर्‍यांची ‘एफआरपी’ ची रक्‍कम थकीत ठेवली आहे, अशा साखर कारखान्यांना महसूल विभागाकडून आरआरसीची नोटिसा बजावण्यात येत आहेत. असे असतानाही अद्याप काही साखर कारखानदारांकडून ‘एफआरपी’ देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही रक्‍कम कधी वसूल होणार, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.