होमपेज › Solapur › निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

Published On: Apr 02 2019 2:03AM | Last Updated: Apr 02 2019 1:51AM
सोलापूर : प्रतिनिधी

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी घोषित करण्यास विलंब लावलेल्या भाजपने मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली आहे. सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे हे बुधवार, 3 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात माढा, माळशिरस, सांगोला, माण-खटाव या चार विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे आमदार आहेत. केवळ करमाळा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. असे असले तरी या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काही मातब्बर मंडळींना आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच माढा लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपच्या गोटात असलेली काही नेतेमंडळी राष्ट्रवादीत गेली तर राष्ट्रवादीतील काही मातब्बर भाजपात आली. त्यामुळे या मतदारसंघातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

दरम्यान, गेल्या पाच दिवसांत माढा मतदारसंघात 11 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज  दाखल केले. सोमवारी भाजपच्या रणजित निंबाळकरांनी तीन अर्ज दाखल केले. यावेळी माजी  खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. नारायण पाटील, शिवसेना नेते शिवाजी सावंत उपस्थित होते. त्याशिवाय बहुजन समाज पक्षाचे शहाजहान शेख, अपक्ष रामदास माने, सिद्धेेश्‍वर आवारे, नवनाथ पाटील, बापूराव रूपनवर, अजिनाथ केवटे, रामदास माने आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.