Fri, Sep 20, 2019 21:43होमपेज › Solapur › बाजार समितीसाठी पालकमंत्र्यांची वेगळी चूल

बाजार समितीसाठी पालकमंत्र्यांची वेगळी चूल

Published On: Mar 22 2018 10:54PM | Last Updated: Mar 22 2018 10:28PMसोलापूर : प्रतिनिधी 

राज्यात सध्या भाजप आणि शिवसेनेची सत्ता असून सोलापूर जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र या दोन्ही मंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष न देता आपापसांतील कुरघोड्यांचे राजकारण सुरू केले आहे. हे अनेक गोष्टींतून सोलापूर जिल्ह्यातील लोकांच्या लक्षात आले असले तरीही यांच्यात अद्याप वरिष्ठ पातळीवरून समझोता झाल्याचे दिसून येत नाही. आगामी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सहकारमंत्र्यांच्या या कुरघोड्यांना वैतागून पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील समविचारी नेत्यांशी संधान साधले असल्याची चर्चा आता रंगली आहे.

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर, करमाळा आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या तीनही निवडणुकांत सत्ताधारी भाजपने संपूर्ण ताकदीने उतरुन याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी व्यूवहरचना आखणे गरजेचे असताना सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मंत्री मात्र एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच व्यस्त आहेत. त्याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत दिसून आला. या निवडणुकीत भाजपची सत्ता असतानाही केवळ दोन्ही मंत्र्यांच्या वादामुळे हे सभापतीपद शिवसेनेकडे जाण्याची वेळ आली आहे. यापूर्वीही सहकारमंत्री आणि पालकमंत्री गटाचे नगरसेवक अनेकवेळा एकमेकांच्या आमने-सामने आल्याने अनेक सत्ता केंद्रे भाजपला गमवावी लागली आहेत. याची अद्याप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी  दखल घेतली नाही. 


सोलापूर जिल्ह्याचा विकास असेल किंवा ग्रामीण भागातील विकास योजना असतील या प्रत्येक ठिकाणी सहकारमंत्री आणि पालकमंत्री यांच्यातील गटबाजीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याला दोन दोन मंत्री मिळूनही जिल्हा विकासाच्याबाबतीत मागे पडला आहे. याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे. 

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका असतील अथवा अशासकीय सदस्यांच्या निवडी असतील अशा प्रत्येक ठिकाणी सहकारमंत्री आणि पालकमंत्री यांचा वाद चव्हाट्यावर आलेला दिसून आला आहे. 

आगामी बाजार समित्यांच्या निवडणुकांत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सहकारमंत्र्यांच्या नादी न लागता जिल्ह्यातील इतर पक्षांच्या समविचारी नेत्यांशी संधान साधले असून त्यांच्याशी मिळतेजुळते घेऊन निवडणुका लढण्याचे धोरण ठेवले असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

बार्शी, करमाळा आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आ. प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत, अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्याशी साटेलोटे केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बाजार समित्यांवर येणारी सत्ता भाजपची असणार की समविचारी नेत्यांची असणार, हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे.