होमपेज › Solapur › अनैतिक संबंधाच्या कारणावरूनच परमेश्‍वर धायंगडे याचा खून

अनैतिक संबंधाच्या कारणावरूनच परमेश्‍वर धायंगडे याचा खून

Published On: Mar 20 2019 1:09AM | Last Updated: Mar 19 2019 11:18PM
सोलापूर : प्रतिनिधी

अनैतिक संबंधाच्या कारणावरूनच ट्रकचालक परमेश्‍वर धायंगडे याचा खून त्याचा सख्खा भाऊजी नामदेव चौधरी याने भावासह दोघांना सोबत घेऊन कट रचून केला. या प्रकरणी पोलिसांनी 48 तासाच्याआतच खुनाचा छडा लावत आरोपी नामदेव चौधरीसह तिघांना अटक केली. कोर्टाने तिन्ही आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथे राहणारा परमेश्‍वर बिरूदेव धायंगडे (वय 30) याचा 16 मार्चरोजी सकाळी 9 वाजण्यापूर्वी कोंडीजवळ अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून पोटातील कोथळा बाहेर काढून खून केला होता. या गुन्ह्याचा तपास करणारे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे यांनी तालुका पोलिसांची चार पथके तयार केली. तीन पथके ही प्रत्यक्ष गुन्हा घडलेल्या परिसरात आणि एक पथक पोलिस ठाण्यात हजर राहून मयत व आरोपी यांची माहिती घेऊन पडताळणी करत होते.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना समजले की, मृत परमेश्‍वर याच्या बायकोचा भाऊ नामदेव चौधरी हा बाहेरख्याली होता. त्याचे गावातीलच एका तरूणीबरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळे परमेश्‍वर हा सख्खा भाऋजी नामदेव चौधरी याला अनैतिक संबंध ठेवू नको असे सांगत होता. त्यामुळे पैशाच्या कारणावरून व अनैतिक संबंधाच्याआड येणार्‍या परमेश्‍वर धायंगडे या मेव्हण्याचा त्याचा सख्खा भावजी नामदेव चौधरी याने त्याचा भाऊ बिरूदेव चौधरी व गोरख गुंड या दोघांना सोबत घेऊन कट रचून खून केला. या प्रकरणी प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे यांनी तपास करून आरोपी नामदेव चौधरी, त्याचा भाऊ बिरूदेव चौधरी आणि गोरख गुंड अशा तिघांना अटक केली. त्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी कोर्टापुढे उभे केले असता कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

कट रचून काढला काटा

अनैतिक संबंधाच्या आड येता म्हणून सख्खा भाऊजी नामदेव चौधरी याने परमेश्‍वर धायंगडे यास 15 मार्चरोजी पाकणी शिवारात एका हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली आणि कट रचल्याप्रमाणे परमेश्‍वर याला ठरलेल्या ठिकाणी नेऊन तेथे आधीच दोघांना उभे करून परमेश्‍वर धायंगडे याचा धारदार शस्त्राने 8 वार करून कोथळा बाहेर काढून खून केला.