Mon, Sep 16, 2019 06:06होमपेज › Solapur › उस्मानाबादच्याही उमेदवारीचा तिढा सुटेना

उस्मानाबादच्याही उमेदवारीचा तिढा सुटेना

Published On: Mar 15 2019 1:47AM | Last Updated: Mar 15 2019 1:47AM
बार्शी ः गणेश गोडसे 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला मोठी गती दिली असल्याचे दिसत आहे. असे असले तरी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना युती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारांची नावे निश्‍चित झाली नसल्याने उत्सुकता वाढत आहे. तिकीट मिळण्याअगोरदरच बार्शी तालुक्यात त्यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला आहे.

बार्शी तालुक्याचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी बार्शी तालुका वगळता इतर पाच तालुक्यांतील गावे पिंजून काढली आहेत. भाजपच्या इच्छुकांनीही आपल्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते, या अपेक्षेने तालुक्यात संपर्क वाढवला आहे. 

तालुक्यात राजकीय उलथापालथ

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उस्मानाबाद मतदारसंघातील इतर तालुक्यांबरोबरच बार्शी तालुक्यातही अंतर्गत  राजकीय उलथापालथ जोरदार सुरू झाली आहे. उस्मानाबादचा खासदार ठरवण्यात बार्शी तालुक्याची आजपर्यंत महत्त्वाची भूमिका राहिली आहे.  आतापर्यंतच्या निवडणुकीच्या निकालावरून हे अनेकदा सिद्ध झाले आहे. 

उमेदवारांकडून भेटींचा सिलसिला

सध्या सर्वच  इच्छुकांनी बार्शी तालुक्यात आपला संपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे. काहींनी तर आपली उमेदवारी निश्‍चित मानून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दिसत आहे. इच्छुक  उमेदवार आपापल्यापरिने मतदारांना आपल्या कार्यपध्दतीची व कामाची ओळख करून देताना दिसत आहेत. बार्शी तालुक्यातील कोणाला लोकसभेच्या तिकिटाची लॉटरी लागणार, याकडेही तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपने बूथ बांधणीद्वारे यंत्रणा सक्रिय केली आहे. सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ यावेळी भाजपला सोडवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. बार्शी तालुक्यासह उस्मानाबाद-कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा, भूम-परंडा-वाशी व औसा या सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपने ही जागा मिळेल, या अपेक्षेने पूर्ण तयारी केली आहे.  या मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्यास आल्यास उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हेही अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

खा. रवींद्र गायकवाड  हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेकडून नेतृत्व करीत आहेत. मात्र गायकवाड यांच्या उमेदवारीस मतदारसंघातील अनेकांनी विरोध दर्शवला आहे. 

बहुजन वंचित आघाडीकडून अर्जुन सलगर यांना उमेदवारी

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, पद्मश्री लक्ष्मण माने तसेच विविध समविचारी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुरातील धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीच्या सभांना मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता उस्मानाबाद मतदारसंघातही आघाडीची जादू कितपत चालणार, हे आगामी काळात समजणार आहे.

बार्शी तालुक्याच्या समावेशाचा मुद्दा गाजणार

मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शी तालुक्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश करण्याची मागणी सध्या तालुक्यात जोर धरू लागली आहे. नगरपालिकेने याबाबत ठरावही केला आहे. बहुतांशी राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही या मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. विशेषतः विविध पक्षांच्या जाहीरनाम्यात याचा समावेश अपेक्षित आहे. या मागणीला समर्थन करणार्‍या उमेदवाराला या भागात लोकपाठिंबा मिळेल, अशी सध्या स्थिती आहे.