होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्याच कारखान्यांना साखर आयुक्तांकडून अभय?

सहकारमंत्र्यांच्याच कारखान्यांना साखर आयुक्तांकडून अभय?

Published On: May 09 2019 1:52AM | Last Updated: May 08 2019 10:58PM
सोलापूर : विशेष प्रतिनिधी

शेतकर्‍यांची ऊस बिले थकविणार्‍या साखर कारखान्यांवर आरआरसी (रेव्हेन्यू अँड रिकव्हरी सर्टिफिकेट) अनुसार कारवाई करण्याचे आदेश पुणे येथील साखर आयुक्तालयाने दिले असून, जिल्ह्यातील नऊ कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यात माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या दोन कारखान्यांचा समावेश आहे. 

तथापि, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या तीन कारखान्यांवर मात्र अशी कारवाई न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तांकडे ऊस बिलाची थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार साखर आयुक्तांनी सोलापूर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांवर कारवाईकरण्याचेआदेश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत.

या कारखान्यांत शिंदे यांच्या परिवारातील दोन कारखान्यांसह सोलापुरातील ‘संत कुर्मदास’ आणि ‘जयहिंद शुगर’ या कारखान्यांवरही कारवाईचे आदेश प्राप्त झाले आहेत. तथापि, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या तीन कारखान्यांकडेदेखील मोठी थकबाकी आहे. त्यांच्या कारखान्यांवर मात्र काहीही कारवाई न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

विशेष बाब म्हणजे, शिंदे बंधूंच्या कारखान्यांवर याचवर्षी साखर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी केली होती. त्यानंतर पुन्हा कारवाईचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे ही कारवाई सूडबुद्धीने झाली का, याबाबतही शंका उपस्थित होत आहे. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी सांगितले की, साखर आयुक्तांनी केलेली कारवाई योग्य आहे. परंतु, त्यांनी सरसकट सर्वच कारखान्यांवर कारवाई करावी. सहकारमंत्री देशमुखांच्या तीन कारखान्यांकडे मोठी थकबाकी आहे. सहकारमंत्रीच ऊसबिल देत नसतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या कारवाईचे आदेश पूर्वीच देण्यात आले आहेत, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या स्थानिक कार्यालयातून देण्यात आलेली आहे. तथापि, निवडणुकीच्या कामांमुळे कार्यवाही करण्यास विलंब होत असावा, असेही सांगण्यात आले. 

पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाने सोलापूर जिल्ह्यातील ‘संत कुर्मदास’, ‘बबनराव शिंदे’, ‘विठ्ठल रिफाईंड’, ‘जयहिंद’ या कारखान्यांवर कारवाईचे आदेश जारी करत साखर जप्ती करण्याचे आदेशित केले आहेत. या संदर्भातील पत्र आजच प्राप्त झाल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सोलापूर कार्यालयातून देण्यात आलेली आहे.

या कारखान्यांवर कारवाईचे आदेश

गोकुळ शुगर्स, जयहिंद शुगर आचेगाव, विठ्ठल कॉर्पोरेशन, बबनराव शिंदे शुगर्स, श्री सिध्देश्‍वर, मकाई, विठ्ठल कॉर्पोरेशन, फॅबटेक शुगर्स, संत कुर्मदास या कारखान्यांवर साखर जप्ती करण्याचे आदेश 31 जानेवारी रोजी संबंधित तहसीलदार यांना देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा या कारखान्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत.