होमपेज › Solapur › ‘जलयुक्‍त’ला हवी निसर्गाची साथ

‘जलयुक्‍त’ला हवी निसर्गाची साथ

Published On: May 15 2019 2:00AM | Last Updated: May 14 2019 11:01PM
सोलापूर : गणेश क्षीरसागर

पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याचा प्रत्येक थेंब भूगर्भात साठवत दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्‍त शिवाराची महत्त्वाकांक्षी योजना अस्तित्वात आणली. या योजनेला जिल्ह्यात उदंड प्रतिसादही मिळाला. शासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून पाचशेहून अधिक गावात जलसंधारणाचे उपचार करण्यात आले. परंतु, जिल्ह्यावर वरुणराजाचीच अवकृपा राहिल्याने ‘जलयुक्‍त’च्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. ‘जलयुक्‍त’च्या कामांची किमया दिसण्यासाठी निसर्गाची साथ मिळणे आवश्यक आहे, हे नक्‍की.

भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्‍त शिवार योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून 2017 ते 19 या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात पाचशेहून अधिक गावांमध्ये कोट्यवधींची जलसंधारणाची कामे करण्यात आली. यामध्ये कंपार्टमेंट बंडिंग, सलग समपातळी चर, माती नाला बांध, अनघड दगडाचे बांध, खोल सलग समपातळी चर, अर्दन स्ट्रक्‍चर, साखळी सिमेंट बंधारे, गॅबियन स्ट्रक्‍चर, चिबड चर, गाळ गाढणे याचबरोबर सिमेंट बंधार्‍यांची दुरूस्ती, गाव तलाव दुरूस्ती, पाझर तलाव दुरूस्ती, अपूर्ण पाझर तलाव पूर्ण करणे आदी कामांचा समावेश होता. या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

दरम्यान, जलयुक्‍त शिवाराच्या कामामध्ये सोलापूरने राज्यात आघाडी घेतली होती. सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आला होता, तर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव ‘जलयुक्‍त’मध्ये राज्यात पहिले आले होते. जिल्ह्यात जलयुक्‍त शिवारची प्रभावी कामे होऊनही या कामांचा सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. गत  दोन वर्षांत झालेल्या ‘जलयुक्‍त’च्या कामांना निसर्गाने दगा दिला. गतवर्षीच्या पावसाच्या मोसमात सरासरीपेक्षा तब्बल 39 टक्के पावसाचे प्रमाण कमी झाले. परिणामी शेतकरी, ग्रामस्थांनी केलेले प्रयोग फसले. पाऊसच कमी झाल्याने जिल्ह्याच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढल्याचे अभावानेच दिसून आले. ‘जलयुक्‍त’च्या कामांचे सकारात्मक परिणाम दिसून येण्यासाठी  निसर्गाची साथही आवश्यक आहे. जिल्ह्यावर वरूणराजाची कृपा होऊन समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्याचा शिवार दुष्काळमुक्‍त होऊन जलयुक्‍त होईल.

तर शेतात सोनं पिकेल
शेतकर्‍यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्यास शेतामध्ये शेतकरी सोनं पिकवतील. पाण्याची टंचाई हे शेतकर्‍यांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. सोलापूर जिल्ह्यात तर सातत्याने दुष्काळ पडत असल्याने या संकटाला शेतकर्‍यांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या संकटाचे कायमचे उच्चाटन करण्यासाठीच गावगाड्यात ‘जलयुक्‍त’च्या कामांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

‘जलयुक्‍त’ला वॉटर कपचा आधार
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केेले जात आहे. या वॉटर कपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची शास्त्रोक्‍त पद्धतीने कामे होत आहेत. शिवाय लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याने ‘जलयुक्‍त’च्या कामांनाही या स्पर्धेचा चांगलाच आधार मिळाला. 
  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex