Thu, May 23, 2019 22:50
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › माढ्यात राष्ट्रवादी, भाजपही गोंधळलेले!

माढ्यात राष्ट्रवादी, भाजपही गोंधळलेले!

Published On: Mar 15 2019 1:47AM | Last Updated: Mar 15 2019 1:47AM
सोलापूर : विशेष प्रतिनिधी

राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस नेमका कोण उमेदवार देणार यावर सत्ताधारी भाजपने आपला उमेदवार निश्‍चित करण्याचे धोरण ठरवले आहे. जिल्हा परिषदेचे भाजप पुरस्कृत अध्यक्ष संजय शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुखही माढ्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. तथापि, पक्ष नेतृत्वाने आदेश दिले तर ते मैदानात दिसू शकतात. राष्ट्रवादीमध्ये विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयसिंह नाईक-निंबाळकर आदी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांपैकी कुणाच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद पवार हे शिक्‍कामोर्तब करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. उमेदवार निश्‍चितीवरून माढ्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे, तर सोलापूर हा काँग्रेसकडे गेलेला आहे. सोलापूर मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव बुधवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी निश्‍चित केले आहे. शिंदे हे काँग्रेसचे राज्यातील प्रचारप्रमुखदेखील आहेत. सोलापूरसाठी भाजपकडून गौडगाव मठाचे प्रमुख डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी यांना कामाला लागण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचाच अर्थ विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट झालेला आहे.

सोलापूरमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी माढ्यातील लढत अद्याप स्पष्ट झालेली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर या जागेसाठी राष्ट्रवादीतून रणजितसिंह मोहिते-पाटील हे प्रबळ दावेदार आहेत. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही रणजितसिंह यांचेच नाव पुढे केले आहे. तथापि, मोहिते कुटुंबाला पक्षातून मोठा विरोध आहे. याव्यतिरिक्‍त सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयसिंह नाईक-निंबाळकर, पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही पवारांकडे उमेदवारी मागितलेली आहे. स्थानिक राजकारण व निवडून येण्याची क्षमता याचा विचार करून पवारांना आपला उमेदवार निश्‍चित करावा लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे बघूनच भाजप आपला उमेदवार देणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे भाजप पुरस्कृत अध्यक्ष संजय शिंदे यांना नुकतेच मुंबईला पाचारण करून त्यांना माढ्यातून उमेदवारी करण्याबाबत सूचना केली होती. परंतु,आपण करमाळा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मुंबईला जात असताना प्रवासादरम्यान अजित पवार यांचा फोन झाल्यानंतर संजयमामांनी भूमिका बदलल्याची चर्चाही होत आहे. त्यामुळे शिंदे यांची उमेदवारी अनिर्णित आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही आपण माढ्यातून उमेदवार नाहीत, असे सांगून त्यांची शक्यता फेटाळली असली तरी पक्षाने आदेश दिला तर ते रिंगणात असू शकतात. राष्ट्रवादीने रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारली तर रणजितसिंह मोहिते 

हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करून माढ्यातून भाजपचे उमेदवार राहू शकतात, असेही राजकीय वरिष्ठांनी सांगितले आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष कसलेल्या पैलावानाप्रमाणे एकमेकांचा अंदाज घेत असून उमेदवार निश्‍चितीबाबत सावध पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे.