Mon, Jun 17, 2019 11:05होमपेज › Solapur › 'माझ्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात किती थापा मारल्या हे मोजा'

'माझ्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात किती थापा मारल्या हे मोजा'

Published On: Apr 15 2019 8:14PM | Last Updated: Apr 15 2019 8:27PM
सोलापूर : प्रतिनिधी

पुलवामा हत्याकांडातील जवानांचे बळी घेणारे आरडीएक्स आले कोठून, दहशतवाद्यांकडे शस्त्रे आली कुठून, निवडणुका आल्यात की जवानांचे बळी जातात कसे, आणि त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्लज्जपणे राजकारण करतात. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकर्‍या गेल्यात. हे सरकार जातीपातीत भांडणे लावत आहे, दंगली घडवत आहेत. हिटलरने जे जर्मनीत केले ते मोदींना भारतात करायचे आहे. नरेंद्र मोदी-अमित शहांना लोकशाही मोडीत काढायची असून, आठ-दहा लोकांच्याच हातात देशाची सत्ता द्यायची आहे, अशा माणसांना आता राजकारणाच्या क्षीतिजावरूनच नाहिसे करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापुरातून देशवासीयांना केले. 

अक्कलकोट रोडवरील कर्णिक नगर येथे सोमवारी राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी जी स्वप्ने दाखवली होती, त्याबद्दल आता ते बोलत नाहीत. त्याउलट पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या जीवावर, एअर स्ट्राईकच्या जीवावर मते मागत आहेत. केंद्रात स्पष्ट बहुमत मिळूनही हे सरकार लोकांशी खोटं बोलत आले आहे. जातीवरून मते मिळविण्यासाठी आरक्षणाची आमिषे दाखवली जात आहे. राज्यातील नोकर्‍यांमध्ये जर स्थानिकांना संधी दिली तर आरक्षणाची गरजच नाही. परंतु, खासगी क्षेत्रातील नोकर्‍यांत स्थानिकांना संधी मिळत नाहीत. सरकारी नोकर्‍या अवघ्या पाच टक्के उरल्या आहेत, या मूठभर शासकीय नोकर्‍या तुम्हाला मिळणार कशा, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. 

गेल्या पाच वर्षांत 14 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगून राज ठाकरे यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, मोदी म्हणाले होते की दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकर्‍या देऊ. मात्र, नोकर्‍या दिल्याच नाहीत. उलट पंतप्रधानांना झटका आला, त्यांनी नोटाबंदी केली. या नोटाबंदीमुळे देशात साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकर्‍या गेल्यात. एका चुकीच्या निर्णयामुळे हे घडले आहे. तरीही ‘अच्छे दिन’ आले असे म्हणायचे का, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. 

मोदी हा चांगला पर्याय असतील असे वाटले होते. पण आता वाटू लागले आहे की, यांच्यापेक्षा काँग्रेस आणि आघाडीचे सरकार चांगले होते. अमित शहा व नरेंद्र मोदी यांना लोकशाही मोडित काढायची आहे. हिटलरने जे जर्मनीत केले, तेच यांना भारतात करायचे आहे. ज्यांच्यावर विश्‍वास दाखविला त्यांनी केसाने गळा कापला आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ होतात, मात्र शेतकर्‍यांचे होत नाही. तेव्हा, हे मोदी-शहा पुन्हा सत्तेवर येणार नाही, याची काळजी घ्या. यांना राजकारणाच्या क्षीतिजावरूनच नाहिसे करा, असे आवाहनही याप्रसंगी राज ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तोंडघशी पाडले
भाजपच्या जाहिरातींची व्हिडिओ क्लिप दाखवत राज ठाकरे यांनी भाजपची पिसे काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल गाव म्हणून घोषित केलेल्या अमरावतीच्या हरिसाल गावात मनसेच्या एका टीमने जाऊन स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात भाजपने जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे गावात सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होत नसल्याचे आढळून आले. जाहिरातीत दाखविण्यात आलेला कथित लाभार्थी आणि गोपालकृष्ण ऑनलाइन सेंटरचा मनोहर खडसे या तरुणालाही कसलाच लाभ मिळाला नसल्याचे दिसून आले. त्यानेही तशी कबुली दिली. त्यावर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आरोप फेटाळले होते आणि या वृत्तवाहिनीलाही गावात जाऊन पाहणी करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार या वृत्तवाहिनीनेही जाऊन या गावातील माहिती घेतली असता राज यांच्या आरोपात तथ्य आढळून आले. ‘डिजिटल गाव’ या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला तरूणच राज ठाकरे यांनी मंचावर आणला. या तरूणाला भाजपवाले शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झालं-गेलं विसरून जा, परत ये. मात्र हा तरूण आपल्या संपर्कात आला. मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली त्यानंतर मुख्यमंत्री म्हटले की राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत. आता हा तरूणच मी तुम्हाला दाखवला आहे, तसेच तिथली परिस्थिती काय आहे? ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे? असा प्रश्‍न राज ठाकरेंनी उपस्थित केला.