Sat, Sep 21, 2019 07:19होमपेज › Solapur › माढा, पांगरीत शांततेत कडकडीत बंद

माढा, पांगरीत शांततेत कडकडीत बंद

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 10:18PM

बुकमार्क करा
माढा / बार्शी : प्रतिनिधी 

राष्ट्रपुरुष व मराठा समाजबांधवांची बदनामी करणारी चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. या चित्रफितीच्या निषेधार्थ माढा शहर बंदचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

या शहर बंदची हाक सोशल मीडियावरूनच देण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या शहर बंददरम्यान सकल मराठा समाजात दोन भिन्‍न मतप्रवाह आढळून आले. यामध्ये काही जण शहर बंद न ठेवता मोर्चाने पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देऊ, असे म्हणत होते, तर काहींनी बंद पाळला गेला पाहिजे, असे मत व्यक्‍त केले. दरम्यान, बंद आहे की नाही, याबाबत व्यापार्‍यांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. अखेर मराठा समाजाच्या बंदच्या तीव्र मागणीच्या भावनेपुढे इतरांनी माघार घेतली. मराठा समाजाच्या विनंतीनुसार व्यापार्‍यांनीही आपापली दुकाने बंद करून बंदमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात बराच काळ गोंधळाचे वातावरण होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात शहर दुमदुमून गेले होते.

या गोंधळात मुख्य चौकातील वाहतूक व्यवस्थेची कोंडी झाली होती. तशातच प्रवाशांनी खचाखच भरलेली एस.टी. महामंडळाची बस रस्त्यतातच बंद पडली होती. यावेळी आतील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. पोलिस प्रशासनाने मोठ्या संयमाने परिस्थिती हाताळली. शहरातील बाजारपेठ बंद असली तरी शाळा, महाविद्यालये, अत्यावश्यक सेवा व तहसील कार्यालय आवारातील विविध सेवा सुरळीत चालू होत्या. यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

सोशल मीडियावर महापुरूषाची बदनामी केल्याप्रकरणी बुधवारी पांगरीसह घारी, पुरी येथे शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. पांगरी शहराची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. सोशल मीडियावर  एका तरूणाने छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजाला अश्‍लिल भाषेत शब्दप्रयोग करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पांगरीसह परिसरातील तरूणांनी बंदची हाक दिली होती. बुधवारी पांगरी येथील तरूणांनी व व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. 

घारी येथे कडकडीत बंद 
घारी गावातील नागरिकांनी व तरूणांनी गाव बंद  आंदोलन करून पांगरी पोलिस ठाण्यात येऊन निषेधाचे लेखी निवेदन दिले. गावातील किराणा दुकाने, पानटपरी आदी सर्वच व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनावर गोरख शेळके, राजेंद्र गिड्डे, ऋषीकेश जगदाळे, विनोद घावटे, गजानन जगदाळे, प्रशांत जगदाळे, अमित जगदाळे, श्रीनिवास जगदाळे आदींच्या सह्या आहेत.

पुरीतही बंद
पुरी येथील शेतकरी व जनतेने याचा निषेध नोंदवत गाव बंद आंदोलन करूण पांगरी पोलिसांत एक लेखी निवेदन दिले. राष्ट्रपुरूषावर जहरी टीका करून मराठा समाजाची मानहानी करणार्‍या दोषी युवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले आहे. पुरीचे सरपंच  अमर पवार, प्रवीण दिडवळ यांच्यासह तरूणांनी पांगरी पोलिस ठाण्यात जाऊन  गावाच्यावतीने निषेधाचे निवेदन पोलिसांना दिले.