होमपेज › Solapur › लोकसभेच्या निकालावर करमाळ्याची राजकीय गणिते

लोकसभेच्या निकालावर करमाळ्याची राजकीय गणिते

Published On: May 23 2019 1:44AM | Last Updated: May 22 2019 10:55PM
करमाळा ः अशपाक सय्यद 

माढा लोकसभा निवडणुकीत विजयाचे दोन्ही बाजूंनी दावे करण्यात आले असले तरीही लोकसभेचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याबरोबर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याही अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर करमाळा विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार असून  निकालावर सर्व राजकीय गणिते अवलंबून असतील. 

लोकसभा निवडणुकीत शिंदे यांना करमाळा, माढा, सांगोला, फलटणमध्ये तर निंबाळकर यांना माळशिरस, माण खटावमधून आघाडी मिळेल, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य विजयसिंह मोहिते-पाटील  देणार असल्याचा दावाही करण्यात आला असून, करमाळा, माढा, सांगोला, फलटण येथून शिंदे यांना मिळणारे मताधिक्य हे माळशिरसचे मताधिक्य तोडणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

संजयमामा शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. तर मोहिते-पाटील गटाला याचा राजकीय फटका बसेल, असे चित्र आहे. माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटीलविरुद्ध संजयमामा शिंदे अशीच लढत झाली आहे. त्यातच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील भूमिकेने संपूर्ण महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. शिंदे यांनी वेळोवेळी मोहिते-पाटलांना आव्हान दिले आहे. जिल्हा परिषदेत तर अल्प मतात असताना शिंदे यांनी मिळवलेले अध्यक्षपद त्यांच्या धूर्त राजकारणाची चुणूक ठरली आहे. 

राजकीय समीकरणे बदलणार

लोकसभा निवडणुकीनंतर निकाल संजय शिंदे यांना अनुकूल ठरल्यास करमाळा कृषि उत्पन्न बाजार समिती व करमाळा नगरपरिषदेमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषदेत जगताप- शिंदे युतीची सत्ता आहे. तर बागल  विरोधात आहेत. बाजार समितीत बागल गटाचे निर्विवाद वर्चस्व असताना विद्यमान सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांच्या तळ्यात मळ्यात भूमिकेने निर्णायक ठरलेल्या संजय शिंदे यांच्या गटाला बागल युतीने अधिक महत्त्व येणार आहे. संजय शिंदे यांच्या दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले तर मात्र आधीपासूनच आमदारकीचा हट्ट करणारे संजय शिंदे आमदारकीसाठी उभे राहतील, असे चित्र आहे. 

लोकसभा निवडणुकीत संजय शिंदेंना विजयी करण्यासाठी बागल गटाचे नेत्या रश्मी बागल-कोलते व दिग्विजय बागल यांनी लावलेला जोर निर्णायक ठरणार की पलटणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. संजय शिंदे हे लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्यास विधानसभा निवडणुकीत थेट बागल-पाटील यांच्यात आमनेसामने टक्कर होण्याची शक्यता आहे. आमदारकी लढविण्याचा हट्ट संजय शिंदे यांनी धरल्यास संजय शिंदे, रश्मी बागल व नारायण पाटील यांची तिरंगी लढतीची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा काँटे की टक्कर विधानसभा निवडणुकीत पहायला मिळणार आहे. 

‘वंचित’चीही भूमिका निर्णायक

वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजयकुमार मोरे, संभाजी ब्रिगेडचे विश्‍वंभर काशीद, भारत मुक्ती मोर्चाचे उमेदवार सुनील जाधव आदी उमेदवारांनी चांगलीच लढत दिली आहे. यात वंचित बहुजन आघाडीला किती मते मिळतात, यावरही बरेच यशापयश अवलंबून आहे. बागल गटाने शिंदेंना विजयी करण्यासाठी,  तर आ. नारायण पाटील यांनी शिंदेंना पराभूत करण्यासाठी जिवाचे रान केले आहे. यश अपयशावर येत्या विधानसभेची भिस्त असल्याने तालुक्यातील पुढार्‍यांसह समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मोहिते-पाटलांचेही शिंदेंना पराभूत करण्याचे प्रयत्न

मोहिते-पाटलांचे लोकसभेसाठी शिंदेंना पराभूत करून करमाळा विधानसभा लढविण्यासाठी शिंदेंना भाग पाडण्याचे डावपेच आहेत. असे घडले तर विधानसभेसाठीही मोहिते-पाटलांचे करमाळ्यातील आवडते नेते आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी ते आपला गट खुलेपणाने  उभा करून पुन्हा नारायण पाटील यांना विधानसभेत पाठविण्याचा प्रयत्न करतील. खासदारकी व आमदारकी या दोन्ही ठिकाणी शिंदेंना पराभूत करून जिल्हा परिषदेच्या बदललेल्या समीकरणातून शिंदे यांना पदावरून खाली खेचण्याचे मनसुबे मोहिते- पाटील यांचे आहेत. 

करमाळा मतदारसंघाचा अनोखा पायंडा

करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारराजाचा कौल सातत्याने बदलत असतो. पंचवीस- तीस वर्षांपासून या मतदारसंघातील मतदारांनी सर्वच गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादीचे तालुक्यात प्राबल्य असताना रश्मी बागल यांनी प्रयत्न करूनही गत लोकसभेला करमाळ्याने राष्ट्रवादीच्या विरोधक सदाभाऊ खोत यांना 14 हजार मतांची आघाडी दिली होती. यापूर्वीही विरोधात आघाडी देण्याची परंपरा करमाळा विधानसभा मतदारसंघात आहे. अशा स्थितीत निंबाळकर यांच्याही करमाळ्यातून मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.