Sat, Jul 04, 2020 05:40होमपेज › Solapur › पहिल्यांदाच भारताची पवित्र विचारधारा कलंकित : ज्योतिरादित्य

मोदींचा हा कसला राष्ट्रवाद; पाकची बिर्याणी खातात, चीनच्या अध्यक्षाला ढोकळा खाऊ घालतात!

Published On: Apr 14 2019 12:20AM | Last Updated: Apr 14 2019 12:20AM
सोलापूर ः प्रतिनिधी

भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला पाठीशी घालणार्‍या पाकिस्तानची बिर्याणी खातात आणि चीनच्या अध्यक्षाला गुजरातमध्ये झोपाळ्यावर बसवून ढोकळा खाऊ घालतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कसला राष्ट्रवाद, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी सोलापुरात केली. मोदी सरकार फक्त ‘घोषणावीर’ सरकार असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी मित्रपक्षांचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ खा. सिंधिया शनिवारी सोलापुरात आले होते. गुजराती भवन येथे आयोजित व्यापारी, उद्योजकांशी संवाद कार्यक्रमापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक यू. एन. बेरिया उपस्थित होते. निवडणूक प्रचारात शहीद जवानांच्या बलिदानाचा मुद्दा घेऊ नका, असे निवडणूक आयोगाने सांगूनदेखील मोदी जवानांच्या मृत्यूचे निवडणुकीसाठी भांडवल करीत असल्यासंदर्भात बोलताना सिंधिया म्हणाले, मोदींचा राष्ट्रवाद हा केवळ दिखाऊपणा आहे.

भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला पाठीशी घालणार्‍या पाकिस्तानात जाऊन मोदी बिर्याणी खातात तर मसूदला जागतिक आंतकवादी घोषित करण्यास चीन नेहमीच विरोध करते तरी चीनच्या अध्यक्षांना गुजरातला बोलवून मोदी त्यांना झोपाळ्यावर बसवून ढोकळा खाऊ घालतात. हा मोदींचा कसला राष्ट्रवाद, अशी टीका सिंधिया यांनी केली. पुलवामा येथे शहीद झालेल्या 39 जवानांना मोदी यांनी शहिदांचा दर्जा दिला नाही. गेल्या पाच वर्षांत देशावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांनी नवे कीर्तिमान या सरकारने नोंदवला असल्याचेही ते म्हणाले. 

सोलापूरच नव्हे तर राज्य आणि देशाच्या विकासात ज्यांनी मोलाचे योगदान दिले आहे, ते सुशीलकुमार शिंदे मोठे क्षमतावादी नेते आहेत. पाच वर्षांत विकास तर नाहीच, पण नोटाबंदी लागू करून सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांना देशोधडीला लावणार्‍या मोदींचे दिल्लीतील सरकार जुमलेबाजीचे सरकार आहे. शेतकरी आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, देशात असहिष्णुतेचे वातावरण ही मोदींची ‘न्यू इंडिया’ विचारधारा आहे. 70 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच भारताच्या पवित्र विचारधारेला कलंकित करण्याचे काम मोदींनी केले असून देश वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. देशात सध्या ‘एक माणूस, एक शासन’ सुरु असून नोटाबंदी, जीएसटी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 70 वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही म्हणणार्‍या मोदींनी पाच वर्षांत 5 लाख युवकांच्या नोकर्‍या घालवल्या, देशात पहिल्यांदाच 6.5 टक्क्यांनी बेरोजगारी वाढवली, शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होताना शेतकरी कर्जमाफी न देता उद्योगपती मित्रांचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज माफ केले, असेही सिंधिया यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास करणार्‍या काँग्रेसने यंदा जाहीरनाम्यात देशातील गरिबी हटविणारी ‘न्याय’ योजना आणली असून गरिबांच्या बँक खात्यावर वर्षाला 72 हजार रुपये दिले जाणार आहेत. महिला सशक्तीकरणासाठी लोकसभा, विधानसेभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण आणले जाणार आहे. आरोग्य आणि शिक्षण मोफत दिले जाणार असल्याचेही सिंधिया यांनी सांगितले.

देशात दोनच दैवत असून एक शेतकरी अन्नदेवता आणि दुसरा मतदाता होय. सुशीलकुमार शिंदे यांना विजयी करून सोलापूरच्या विकासाबरोबर देशाचे हात बळकट करा, असे आवाहनही सिंधिया यांनी केले आहे.

मोदी सरकार ‘घोषणावीर’ सरकार 

मोदींचे राजकारण म्हणजे खुर्चीसाठी काहीपण करण्याचे लांच्छनास्पद राजकारण आहे. पंतप्रधानपदाचे स्टेटस न राखता व्यक्तिगत हल्ले करून राजकारणाचा स्तर मोदींनी घसरवला असून तो पुन्हा राखण्याची जबाबदारी आपली आहे. सोलापुरात नवीन विमानतळ केले नाही, विमानसेवा सुरू केली नाही, पण विमाननिर्मिती करण्याची घोषणा करणारे मोदी सरकार ‘घोषणावीर’ सरकार आहे.