Sat, Jul 11, 2020 12:40होमपेज › Solapur › भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी मिळाली नाही 

भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी मिळाली नाही 

Published On: Jan 31 2019 1:34AM | Last Updated: Jan 31 2019 12:11AM
भोसे : वार्ताहर

काँग्रेस आघाडीचे सरकार केंद्रात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या आग्रहाखातर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकर्‍यांना मिळाली परंतु आजच्या भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापपर्यंत राज्यातील शेतकर्‍यांना दिलेली नाही  अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोसे ( ता.पंढरपूर ) येथील जाहीर सभेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन  निर्धार यात्रेच्या जिल्ह्यातील पहिली सभा भोसे येथे प्रचंड गर्दीमध्ये  पार पडली. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहित-पाटील, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य राजूबापू पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना, आश्‍वासने पूर्ण न करणारे हे सरकार आहे. देशातील संस्थात्मक रचना मोडीत काढण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोपही आमदार जयंतराव पाटील यांनी केला.  भाजप सरकारने केलेल्या फसव्या घोषणाबाबत लोकांमध्ये भाजप सरकारविरोधात तीव्र नाराजीची भावना असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. 

आज शेतकरी स्वतःचं सरण स्वतः रचतोय आणि आपलं जीवन संपवत आहे इतकी वाईट वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. आज मंत्रिमंडळात शेतकर्‍यांचा प्रतिनिधी नसल्याने अशी वेळ शेतकर्‍यांवर आली आहे असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.  आज वर्तमानपत्रात भाजपचा नवा घोटाळा  डीचएफएल कंपनीच्या माध्यमातून 31 हजार कोटी रुपयांचा समोर आला आहे यामधील 30 कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा झाले आहेत असे सांगतानाच जनतेचा हा पैसा बँका आता वसूल कसे करून देणार हेही आता जाहीर करावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. 

2 कोटी नोकर्‍या देणार म्हणून आजची ही तरुणाई ’हर हर मोदी घर घर मोदी’ म्हणत उड्या मारत होती. परंतु साडेचार वर्षांत नोकरीच्या आमिषाने तरुणाला फसवलं हे लक्षात आल्यावर आज हिच तरुणाई दबक्या आवाजात बोलत आहे. दिवसाढवळ्या जनतेच्या पैशाची लूट केली ते भाजपवाले कुठल्या तोंडाने मत मागायला येणार आहेत अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी केली.

या सभेत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य राजूबापू पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केले. यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, माजी युवक अध्यक्ष उमेश पाटील, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, समता परिषदेचे प्रा. जयंत भंडारे, मानाजी माने, माजी.जि.प.अध्यक्षा सौ. जयमाला गायकवाड, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी महापौर मनोहर सपाटे, पंढरपूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पवार, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ कार्याध्यक्ष दीपक वाडदेकर, लतीफ तांबोळी, जि.प.सदस्य अतुल खरात, पं.स.सदस्या सौ. प्रफूल्लता पाटील, शेखर पाटील, भोसेच्या सरपंच सौ. सुदामती कोरके,  जयवंत गावंधरे, सुनिल तळेकर, नागनाथ भांडे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, युवक तालुकाध्यक्ष अरुण आसबे, आप्पासाहेब जाधव, आर. डी. पवार, कृष्णात माळी, मारूती भिंगारे, निर्मला बावेकर, अनिता पवार, संदीप मांडवे, जिल्हा उपाध्यक्ष हणूमंत पवार, महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे आदींसह पंढरपूर, माढा, मोहळ येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. आभार उपसरपंच गणेश पाटील यांनी मानले.