Sat, Jul 04, 2020 04:36होमपेज › Solapur › गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉक्टरला रंगेहाथ पकडले

गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉक्टरला रंगेहाथ पकडले

Published On: Mar 04 2019 4:27PM | Last Updated: Mar 04 2019 4:27PM
टाकळी सिकंदर (सोलापूर) : प्रतिनिधी

गर्भलींग निदान चाचणी केल्याप्रकरणी मोहोळ येथील डॉक्टर आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टर सत्यजित मस्के, माया अष्टूळ  व रिक्षाचालक आप्पा आदलिंगे अशी या तीघा जणांची नावे आहेत. आरोपींना मोहोळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे मोहोळ परिसरात एकच खळबळ उडाली. 

स्त्रियांचे कमी होत असलेले प्रमाण रोखण्यासाठी शासनाच्यावतीने गर्भलिंग निदान कायद्याची राज्यभर अंमलबजावणी केली जात आहे. यातच मोहोळ येथे माया अष्टूळ नावाची  महिला गर्भलिंगनिदान चाचणी करत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुमेद अंदुरकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वैद्यकीय विभागातील एक पथक तयार केले. त्या पथकासोबत एका डमी गर्भवती महिलेस सहभागी करून त्या महिलेमार्फत माया अष्टूळ बरोबर संपर्क केला. त्यानुसार मायाने दिनांक दोन मार्च रोजी प्रथम संबंधित गर्भवती महिलेस सोलापूर येथे बोलावून घेऊन तिची चौकशी केली. तर आज सोलापूरमध्ये काम होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर काल, रविवार (दि.३)  रोजी सकाळी पंढरपूर येथील बस स्थानकावर संबंधित गर्भवती महिलेला बोलावून घेतले. 

दरम्यान यांच्यामागे वैद्यकीय पथक सातत्याने पाळत ठेवून होते. पंढरपूर येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे संबंधित गर्भवती महिलेस सांगण्यात आले. त्यानंतर ती त्या महिलेला घेऊन मोहोळ येथे आली. त्या ठिकाणी माया अष्टूळच्या संपर्कात असलेला नेहमीचा रिक्षावाला आप्पा गणेश आदलिंगे हा अगोदरच येऊन थांबला होता. गर्भवती महिलेसह सर्व जण मोहोळ येथील विहान हॉस्पिटल येथे आणत संबंधित गर्भवती महिलेला तात्काळ गर्भलिंग निदान विभागात नेण्यात आले. त्यावेळी मायाने सदर गर्भवती महिलेस या चाचणीसाठी १४ हजार रुपये लागतील असे सांगितले.

दरम्यान म्हस्के यांनी संबंधित गर्भवती महिलेची लिंग निदान चाचणी करून गर्भामध्ये पुरुष जातीचे अर्भक असल्याचे सांगितले. याचवेळी वैद्यकीय पथकाने धाड टाकत म्हस्के यांच्यावर कारवाई केली. याचवेळी डॉक्टर म्हस्के यांच्यासह संबंधित मायाने आम्ही आत्महत्या करू, इथे काहीच घडलेले नाही असा कांगावा करत आरडाओरडा करून आलेल्या पथकाला शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना मोहोळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर हे करत आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुमेद आंदूरकर यांच्या पथकाने विहान रुग्णालयातील सोनोग्राफी ची मशीन व संबंधित सर्व रेकॉर्ड असा सुमारे पाच लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सील केला आहे .या बाबतचा अहवाल वरिष्ठांना देऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा विभागाच्या वतीने सांगण्यात आले