Fri, Sep 20, 2019 21:41होमपेज › Solapur › द्राक्षांची राखण करण्यावरून पत्नीचा खून; पती ताब्यात

द्राक्षांची राखण करण्यावरून पत्नीचा खून; पती ताब्यात

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 10:57PMपंढरपूर : प्रतिनिधी

द्राक्ष बागेची पाखरांपासून  राखण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने डोक्यात दगड घालून पत्नीचा निर्घृण खून केला. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजता कासेगाव येथे घडली आहे. सुरेखा मोहन फुगारे (वय 38) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती मोहन सुभाष फुगारे (रा. फुगारे वस्ती, कासेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कासेगाव (ता. पंढरपूर) येथे फुगारे वस्तीवर मोहन सुभाष फुगारे यांचे शेत आहे. येथील शेतात द्राक्ष पीक आहे. या द्राक्षांची पाखरांपासून राखण करण्याचे काम फुगारे कुटुंबीय करीत आहे. मात्र, सोमवारी सकाळी 11 वा.सुरेखा फुगारे या शेतात मका पिकाची खुरपणी करीत होत्या. यावेळी पती मोहन फुगारे याने सुरेखाला द्राक्ष बागेवर बसलेली  पाखरे हकलण्याबाबत सांगितले होते. यावेळी पाखरे हकलण्यावरून पती-पत्नीत भांडण सुरू झाले. या भांडणाचा राग अनावर झाल्याने मोहन फुगारे  याने  सुरेखाच्या डोक्यात मोठा दगड घातल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलिस निरीक्षक खराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मोहन  फुगारे यास  ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलिस करीत आहेत.