होमपेज › Solapur › बळीराजाचे कल्याण व्हावे, चांगला पाऊस पडावा; मुख्यमंत्र्यांचे विठोबास साकडे(video)

बळीराजाचे कल्याण व्हावे, चांगला पाऊस पडावा; मुख्यमंत्र्यांचे विठोबास साकडे(video)

Published On: Jul 12 2019 7:54AM | Last Updated: Jul 12 2019 12:06PM
पंढरपूर : प्रतिनिधी

राज्यात चांगला पाऊस पडावा, बळीराजाचे कल्याण व्हावे असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठोबाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठोबाला हे साकडे घातले. 

दरम्यान यंदाचे मानाचे वारकरी म्हणून महापूजेला उपस्थित राहण्याचा मान आणि लातूरचे वारकरी विठ्ठल मारुती चव्हाण आणि प्रयाग मारुती चव्हाण या शेतकरी दांम्‍पत्यास मिळाला. विठ्ठलाची शासकीय महापूजा आज शुक्रवारी  पहाटे पार पडली. 
 

यावेळी विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर, पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. नरेंद्र पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आज (शुक्रवार) पहाटे 2 वाजता प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. तत्पूर्वी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते विठ्ठलाची तर समिती सदस्य तथा नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची पाद्यपूजा करण्यात आली. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्निक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल मारुती चव्हाण आणि सौ. प्रयाग विठ्ठल चव्हाण या शेतकरी दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाच्या चव्हाण दांम्‍पत्‍याला विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली.

विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि वारकरी चव्हाण दांपत्याच्या  हस्ते रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि चव्हाण यांच्या पत्नीने ओटी भरली. यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमामध्ये मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य विठ्ठल मारुती चव्हाण दांपत्याला चांदीची विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन त्‍यांचा सत्कार करण्यात आला. 

आषाढी एकादशीसाठी पंढरीत 12 लाखांहून अधिक वैष्णवांची मांदियाळी जमली आहे. पहाटेपासूनच चंद्रभागेत स्नान, नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी दिंड्या आणि वारकऱ्यांनी दाटी केली आहे.