Fri, May 29, 2020 18:22होमपेज › Solapur › कानठळ्या बसवणार्‍या विजांच्या कडकडाटांत पावसाची हजेरी

कानठळ्या बसवणार्‍या विजांच्या कडकडाटांत पावसाची हजेरी

Last Updated: Oct 09 2019 11:24PM
सोलापूर ः प्रतिनिधी

शहरासह काही भागांत बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटांत  30 मि. मी. पाऊस पडला असून, परतीच्या पावसाने दिलासा मिळाल्याने जिल्ह्यात पावसाने सरासरीच्या 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या 54.52 टक्के इतक्या पावसाची नोंद महसूलकडे झाली असून, माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 79 टक्के, तर अक्कलकोटमध्ये 40.78 टक्के पाऊस पडला आहे.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि कानठळ्या बसविणार्‍या विजांच्या कडकडाटांत पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर पडलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली होती. विजांचा कडकडाट इतका मोठा होता की जणू डोक्यावरच वीज पडते की काय, असा भास होत होता. 

सलग दोन वर्षे पावसाने पाठ फिरवल्यानंतर यंदा परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी गतीने वाढत आहे. महसूल खात्याने जिल्ह्यातील 91 मंडल अधिकारी कार्यालयांत बसविलेल्या पर्जन्यमापकामध्ये झालेल्या नोंदीनुसार ही पावसाची आकडेवारी आहे.

तालुकानिहाय पडलेला पाऊस असा:  उत्तर सोलापूर 330.21 मि.मी., दक्षिण सोलापूर 327.15 मि.मी., बार्शी 317.14 मि.मी., अक्कलकोट 245.42 मि.मी., मोहोळ 266.21 मि.मी., माढा 235.25 मि.मी., करमाळा 212.68 मि.मी., पंढरपूर 250.68 मि.मी., सांगोला 251.04 मि.मी., माळशिरस 291.50 मि.मी., मंगळवेढा 204.22 मि.मी. असा पाऊस पडला आहे.

शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडे झालेल्या नोंदीनुसार शहरात तासाभरात 30 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

शासनाने ‘महावेध’ कृषी खात्याचे पर्जन्यमान ग्राह्य धरण्याचे आदेशित केले असून ‘महावेध’ नुसार जिल्ह्यात सरासरीच्या 75 टक्के इतका पाऊस झाला आहे. महसूलच्या सर्कल पर्जन्यमापकानुसार जिल्ह्यात सरासरीच्या  55 टक्के इतक्या पावसाची नोंद आहे.