Mon, Sep 16, 2019 11:48होमपेज › Solapur › महिलेचे 9 तोळ्याचे दागिने लंपास

महिलेचे 9 तोळ्याचे दागिने लंपास

Published On: Dec 01 2017 9:08AM | Last Updated: Nov 30 2017 10:23PM

बुकमार्क करा

बार्शी : तालुका प्रतिनिधी 

देवीदर्शनासाठी आलेल्या महिलेस दोघांनी बेदम मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटून तिच्या गळ्यातील 5 तोळ्यांचे गंठण व हातामधील 4 तोळ्यांच्या पाटल्या असा 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचा 9 तोळे सोन्याचे दागिने काढून घेतल्याची घटना चारे(ता. बार्शी) येथील कालिकामाता मंदिरासमोर घडली.

छाया रामेश्वर जगदाळे (रा. धारूर चौक, केज, जि. बीड) असे दागिने काढून घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून अरूण राजाराम जगदाळे व सीमा अरूण जगदाळे दोघेही (रा. चारे (ता. बार्शी) अशी मारहाण करून सोने काढून घेतलेल्यांची नावे आहेत. 

जखमी छाया जगदाळे यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे पती केज (जि. बीड) येथे नोकरीस असल्यामुळे त्या पतीसह केज येथील धारूर चौकात राहण्यास आहेत. गावाकडे शेती असल्यामुळे त्या अधूनमधून गावाकडे येत असतात. गावात आल्यानंतर कालिकामातेचे दर्शन घेऊन मंदिरासमोर बसून ज्याने आमचे शेत घेतले, त्याला देवीच बघून घेईल, असे स्वतःशीच बोलत असताना दोघांनी तेथे येऊन तू आम्हालाच तसे म्हणालीस, असे म्हणून एकाने हात धरून गळ्यातील गंठण काढून घेतले.तसेच हातामधील पाटल्याही काढून घेतल्या. तसेच मारहाण करून जखमी केले. 
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर दागिने काढून घेतल्याप्रकरणी पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत. 

पॉलिशच्या बहाण्याने दीड तोळे सोने लंपास

पितळ व सोन्याचे दागिने कंपनीच्या जाहिरातीसाठी विनामूल्य पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोन्याची अंगठी व मिनी गंठण असे 37 हजार 500 रुपयांचे महिलेचे दीड तोळा सोन्याचे दागिने लंपास केल्याचा गुन्हा करमाळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार करमाळा मधील देवीचा माळ येथील कस्तुरबानगर येथे घडला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात इसमांच्या विरोधात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी शीतल अजित यादव (वय 30) रा. कस्तुरबानगर श्रीदेवीचा माळ, करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.  शीतल यादव या दुपारी घरी एकट्याच होत्या. त्यांचे पती हे करमाळा येथे ऑटोमोबाईल दुकानात व्यवसायासाठी गेले होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्‍ती त्यांच्या घरी आल्या. त्यांनी हिंदीेत बोलत आम्ही कंपनीच्या जाहिरातीसाठी आलो असून आम्ही पितळ आणि सोन्याच्या वस्तू व दागिने विनामूल्य पॉलिश  करून देतो, असे सांगितले. 

यावेळी आपण एकटेच घरी असल्याने याला त्यांनी नकार दिला. मात्र, त्यांनी गोड गोड बोलत जास्त आग्रह धरला. नकार देऊनही ते  ऐकत नसल्याने घरातील छोटी पितळी परात पॉलिश करण्यास दिली. 
त्यांनी ती कल्हई करून दिल्यानंतर त्या दोघांनी पॉलिश करण्यासाठी बोटातील सोन्याची अंगठी, मिनी गंठणची मागणी केली. यावेळी सौ. यादव यांनी दोन ग्रॅमची अंगठी व गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण असे अंदाजे किंमत पंचेचाळीस हजार रुपयांचे पॉलिश करण्यासाठी दिले. 

या दागिन्यांना जास्त केमीकल पडले आहे, ते धुवून लावण्यासाठी कुकरमध्ये गरम पाण्यात हळद टाकून घेऊन येण्यास सांगितले. कुकरमध्ये पाणी आणल्यानंतर अंगठी आणि गंठण कुकरमधील हळदीच्या पाण्यात टाकल्याचा बनाव केला व दागिने कुकरमध्ये टाकल्याचे सांगितले व कुकरचे पाणी थंड झाल्यानंतर कुकर उघडण्यास सांगितले. 

ते दोघेही दागिने घेऊन निघून गेले. नंतर पाणी थंड होताच कुकरच्या पाण्यात पाहिले असता दागिने गायब असल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे पाहून त्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. यादव यांच्या नातेवाईकांच्या घरी लग्न असल्याने लग्न समारंभ होताच या घटनेची फिर्याद शीतल यादव यांनी गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांत दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक ए. के. वने हे करीत आहेत.