Thu, Jun 04, 2020 02:06होमपेज › Solapur › स्मार्ट सोलापूरला कचर्‍याचे ग्रहण

स्मार्ट सोलापूरला कचर्‍याचे ग्रहण

Last Updated: Oct 09 2019 11:21PM
सोलापूर ः प्रतिनिधी 
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सोलापूर शहराचा समावेश झाला. त्यानुसार सध्या सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे चालू आहेत. मात्र, शहरातील कचर्‍याचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचे दिसत आहे. महापालिकेने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आणल्या, परंतु वेळेवर कचरा उचलत नसल्यामुळे नागरिकांना पुन्हा उघड्यावर कचरा टाकावा लागत आहे. 

पूर्वी शहरातील कुंडीमधील कचरा त्याच ठिकाणी जमा करून जाळण्यात येत होता. मात्र, शहरात महापालिकेच्या 209 घंटागाड्यांद्वारे दररोज घरोघरी जाऊन कचरा उचलण्यात येत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात अनेक भागांत आठ ते दहा दिवस घंटागाडीच येत नाही, असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांना पुन्हा उघड्यावर कचरा टाकावा लागत आहे.  कचराकुंडीमधील कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे त्याठिकाणी अक्षरशः घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत महापालिकेला कोणत्याही प्रकारे गांभीर्य नाही. घंटागाडीमुळे शहरातील काही भागांतील कचर्‍याचे प्रमाण  कमी  झाले असले तरी ज्या भागांत घंटागाड्या येत नाहीत त्याठिकाणी पुन्हा कचरा पहायला मिळत आहे. या कचर्‍यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मलेरिया आणि इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे  शहराचा  विकास होत असताना दुसरीकडे कचर्‍याच्या वाढलेल्या प्रमाणाने ‘स्मार्ट सिटी’ ला कचर्‍याचे ग्रहण लागले आहे. ‘स्मार्ट सिटी’ मधील रस्ते हे शहराची शोभा वाढवत आहेत. हे पाहून शहरातील नागरिकांना बरे वाटत आहे. परंतु, शहराच्या मुख्य रस्त्यांपासून एक किलोमीटर बाहेर कचर्‍याचे ढीग तसेच पहायला मिळत आहेत.  यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांकडेला तसेच नागरी वसाहतींच्या ठिकाणी कचरा साचलेला दिसत आहे. विशेषतः भाजी मार्केटच्या ठिकाणी कचर्‍याचे प्रमाण अधिक पहायला मिळत आहे.  त्याचप्रमाणे शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या अनेक ठिकाणी उघड्यावर टाकलेल्या  पहायला मिळत आहेत. प्लास्टिकच्या वापरामुळेदेखील कचरा अधिक प्रमाणात पहायला मिळत आहे. 

शहरातील मुख्य ठिकाणी घंटागाड्या कचरा उचलतात. परंतु, झोपडपट्टीच्या ठिकाणी कचरा तसाच पडून असल्याचे पहायला मिळत आहे. विशेषतः पूर्व भाग, घरकूल परिसर, कुंभार वेस, आयटीआय परिसर, कंबर तलाव भागात, सत्तर फूट भाजी मार्केट, नई जिंदगी, शास्त्रीनगर येथे कचर्‍याचे ढीग आहेत.