होमपेज › Solapur › राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील

Published On: Jun 14 2018 7:29PM | Last Updated: Jun 14 2018 7:29PMपंढरपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी  माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.  आज मुंबईत राष्ट्रवादीच्या 24 जिल्हाध्यक्षांची नावे पक्षातर्फे घोषित करण्यात आली. यामध्ये सोलापूर च्या जिल्हाध्यक्ष पदी दीपक साळुंखे पाटील यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात पक्षातर्फे नूतन जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून या पदासाठी केवळ दीपक साळुंखे-पाटील यांच्याच नावाची सर्व संमतीने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे साळुंखे-पाटील यांची निवड जाहीर होणे केवळ औपचारिकता राहिली होती. आज मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यातील 24 जिल्हाध्यक्ष यांची नावे जाहीर केली. यामध्ये दीपक साळुंखे पाटील यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. 

दीपक साळुंखे-पाटील हे मागील ४ वर्षांपासून पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. अतिशय कठीण काळात साळुंखे पाटील यांनी पद सांभाळताना पक्षातील गटबाजी, कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य बाजूला सारून पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे दीपक साळुंखे यांना सर्वांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे. येत्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणूका होत आहेत. या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला शाबूत राखण्याबरोबरच सर्व नेत्यांशी सलोखा राखून पक्ष पुढे न्यावा लागणार आहे.  पार्श्वभूमीवर साळुंखे- पाटील यांच्यासाठी अध्यक्षपदाची दुसरी इनिंग अतिशय आव्हानात्मक असणार आहे.