होमपेज › Solapur › चारित्र्याच्या संशयावरून भावाकडून बहिणीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून भावाकडून बहिणीचा खून

Published On: Mar 15 2019 1:47AM | Last Updated: Mar 14 2019 11:43PM
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

चारित्र्याच्या संशयावरून भावाने सख्ख्या विवाहित बहिणीच्या डोक्यात झोपेतच दगडी पाटा घालून तिला ठार मारल्याची घटना गुरुवारी शहरातील पाटील चाळ भागात घडली.

पूजा संदीप गायकवाड (वय 21, रा. वडगाव शेरी, पुणे, हल्ली रा. पाटील चाळ, बार्शी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सोमनाथ बाळू ओहोळ (वय 19, रा. बार्शी) असे खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला चार दिवसांची  पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत सोमनाथच्या आई चंदा बाळू ओहोळ यांनी फिर्याद दिली आहे. 

पूजा हिचे लग्न संदीप गायकवाड (रा. वडगावशेरी) यांच्यासोबत  3 वर्षांपूर्वी झाले होते. सहा  महिन्यांपूर्वी पूजा हिला तिच्या सासरच्या लोकांनी तिची वागणूक चांगली नाही म्हणून माहेरी पाठवून दिले होते. मुलीस नांदण्यास घेऊन जा, असे सांगूनही पूजाच्या सासरचे लोक तुमच्या मुलीची वागणूक चांगली नाही, असे सांगून नांदण्यास घेऊन जात नव्हते. तेव्हापासून पूजा व तिचा दीड वर्षाचा मुलगा असे दोघेजण माहेरीच राहत होते. पूजाचा भाऊ सोमनाथ हा पूजाला नीट वाग, आम्हाला गल्लीत मान खाली घालायला लावू नको, असे समजावून सांगत होता. त्यावरुन त्या दोघांमध्ये भांडणही होत होते. सोमनाथ तिला तू नीट वागली नाहीस तर तुला खलास करतो, असे म्हणत होता. 

बुधवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. पूजाही लहान मुलासमवेत झोपी गेली. सोमनाथ शेजारीच झोपला होता. रात्री दीडच्या सुमारास सोमनाथ याने झोपेतून उठून पूजाच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. जखमी अवस्थेत पूजा हिला जगदाळे मामा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी मृत म्हणून घोषित केले. 

याबाबत पूजाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय नाईक-पाटील, पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप जोरे करत आहेत.