Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Solapur › भरझोपेत डोक्यात घण घालून धाकट्या भावाची निर्घृण हत्या

भरझोपेत डोक्यात घण घालून धाकट्या भावाची निर्घृण हत्या

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:22AMवैराग : प्रतिनिधी

शेतगड्यावरून झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून मोठ्या भावाने भरझोपेत असलेल्या लहान भावाच्या डोक्यात लोखंडी घण घालून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना हत्तीज (ता. बार्शी) येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. 

दरम्यान, गेल्या आठवड्यातच खांडवी येथे मोठ्या भावाने धाकट्या भावाच्या कुटुंबासह आईचा जाळून खून केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या घटनेची फिर्याद मृताचे वडील सूर्यकांत जाधव यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे. तर खुनानंतर उसाच्या फडात लपून बसलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. सूरज सूर्यकांत जाधव (वय 26) असे खून झालेल्या धाकट्या भावाचे, तर सुहास सूर्यकांत जाधव (वय 31) असे खून करणार्‍या मोठ्या भावाचे नाव आहे.

सविस्तर असे की, सुहास सूर्यकांत जाधव हा पत्नी, वडील व लहान भाऊ सूरज यांच्यासह हत्तीज येथे एकत्रित राहण्यास आहेत. सुहास हा शीघ्र संतापी असल्याने घरात सतत भांडणे होत होती. दरम्यान, जाधव यांच्या शेतात शेतगडी म्हणून काम करणार्‍या सुनील नागनाथ क्षीरसागर यास किरकोळ कारणावरून सुहास याने मारहाण केली. त्यास लहान भाऊ सूरज जाधव याने विरोध केला होता. याचा राग मनात धरून सुहास जाधव याने मध्यरात्रीच्या सुमारास शेतगड्यासह शेतात झोपलेल्या सूरज जाधव याच्या डोक्यात लोखंडी घण घालून त्याचा निर्घृण खून करत सूड उगवला. झोपेत असलेल्या सूरजवर केलेला हा हल्ला इतका तीव्र होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घाबरलेल्या शेतगड्याने शेतातून पळ काढला. त्यानंतर घरात कडी लावून झोपलेल्या जाधव कुटुंबीयांना ही माहिती समजल्यानंतर सूरजला मध्यरात्रीच बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेनंतर करमाळ्याचे विभागीय पोलिस अधिकारी स्वामी व पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तात्काळ हालचाल केल्याने आरोपी सुहास जाधव याला उसाच्या शेतात लपून बसलेले असताना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास जगताप करीत आहेत.