Mon, Sep 16, 2019 11:33होमपेज › Solapur › भाळवणी पाणीपुरवठा योजना धूळखात

भाळवणी पाणीपुरवठा योजना धूळखात

Published On: Oct 22 2018 1:47AM | Last Updated: Oct 21 2018 8:53PMभाळवणी : नितीन शिंदे

4 गावांसाठीची भाळवणी  प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतींच्या अनास्थेमुळे धूळखात पडलेली असून ही योजना कधीही सुरळीत चालली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेला ही योजना चालविणे शक्य नसल्यामुळे ही योजना चालविण्यासाठी लाभार्थी ग्रामपंचायतीच्या शिखर समितीकडे हस्तांतर केली आहे. मात्र विजेचे वाढते बिल व पाणीपट्टी परवडत नाही, गरजेपेक्षा जास्त पाणी घ्यावे लागते, काही गावांना पाण्याची कमतरता भासत नाही, अशा अनेक कारणांनी या योजनेकडे ग्रामपंचायत शिखर समितीने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे पाणी पुरवठ्याची करोडो रूपयांची योजना धूळखात पडली आहे  आणि योजनेंतर्गत असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाली आहे.

भाळवणी परिसरात टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे भाळवणी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली होती. या योजनेंतर्गत भीमा नदीवरील पिराची कुरोली येथील बंधार्‍यातून उचल पाणी घेऊन भाळवणी येथे पाण्याची टाकी उभारून भाळवणीसह सुपली, पळशी, उपरी या चार गावांतील लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. परंतु योजनेकडे सुपली, पळशी, उपरी या ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत पाठच फिरविली असल्याचे दिसते. भाळवणी ग्रामपंचायतीने उन्हाळ्यातील काही काळ पाणी घेतल्याचा अपवाद वगळता अद्यापपर्यंत ही योजना धूळखात पडलेली आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी, बोअर कोरडे पडले आहेत. सध्या भाळवणी गावात गल्लीवाईज दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून लोकांना सायकलीवरून भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी पाच ते सहा दिवसांतून नळाला पाणी येत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. 

ही योजना खर्च भागविण्यासाठी एकट्या भाळवणी ग्रामपंचायतीला परवडणार नाही, अशा दराने गरजेपेक्षा जास्त पाणी घ्यावे लागत असल्यामुळे पाणीपट्टीचा वाढता भार व भरमसाठ वीज बिल आकारणीमुळे ही योजना परवडत नसल्याचे निर्वाळा ग्रामपंचायत  सांगत  आहे.  

ग्रामपंचायतीकडे पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे येथील नागरिकांना या योजनेचे महत्त्व पटू लागले आहे. ही योजना बर्‍याच दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे पंप हाऊस, शुध्दीकरण केंद्र, पाणी साठवण केंद्र, नादुरूस्त झाले असून नदी पात्राजवळील मोटर, इंजिनवरती गंज चढल्याचे दिसून येते. सध्या या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा लागणार असून लाईट बिल व पाणीपट्टीही लाखो रूपये थकीत आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे योजना बंद अवस्थेत असून ही योजना असून अडचण आणि नसून खोळंबा अशी झाली आहे. त्यामुळे शिखर समितीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी एकत्रित चर्चा करून योजना बंद अवस्थेत का राहिली? ग्रामपंचायत या योजनेंतर्गत पाणी घेण्यास टाळाटाळ का करीत आहे? याविषयावर कायमस्वरूपी तोडगा काढून बंद अवस्थेत असलेली भाळवणी प्रादेशिकपाणीपुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

शिखर समितीने पुढाकार घ्यावा
 भाळवणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना शिखर समितीकडे हस्तांतर केली आहे. थकीत वीजबिल मोठ्या प्रमाणात असून काही वर्षे ही योजना बंद असल्यामुळे थोडीफार देखभाल दुरूस्तीही करावी लागणार आहे. एकूण लाईट बिलाच्या 50 टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडून दिली जाते. परंतु त्या अगोदर शिखर समितीने थकीत वीज बिल भरणे आवश्यक आहे. सदर योजनेचा चालू वर्षी टंचाई आराखड्यात समावेश केला असून देखभाल दुरूस्तीसाठी जि. प.मधून निधी उपलब्ध करून ही योजना सुरू केली जाईल. त्यासाठी शिखर समितीने संपूर्ण लाईट बिल भरून पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
एस.एस. डोंगरे, उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा योजना