होमपेज › Solapur › रामाच्या नावाने जुमला नको ; उद्धव ठाकरे

रामाच्या नावाने जुमला नको ; उद्धव ठाकरे

Published On: Dec 25 2018 1:34AM | Last Updated: Dec 25 2018 1:34AM
पंढरपूर : प्रतिनिधी

 ‘अच्छे दिन’च्या नावाने जुमला केला. 15 लाखांच्या नावाने जुमला केला; मात्र रामाच्या नावाने जुमला करू नका. हिंदूंच्या भावनांशी खेळू नका, असे आवाहन करतानाच ‘कुंभकर्णा जागा हो! नाही तर पेटला हिंदू जागा दाखवून देईल,’ असा   इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या जाहीर महासभेत भाजपला दिला.  त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा राहील आणि प्रसंगी रस्त्यावर उतरेल, असा विश्‍वासही ठाकरे यांनी यावेळी दिला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या महासभेला राज्यभरातून आलेले 2 लाखांवर शिवसैनिक, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, राज्य आणि केंद्रातील मंत्री तसेच शेकडो संत मंडळी उपस्थित होती. 

पंढरपूरच्या विराट महासभेत भाजपवर सडकून टीका
येथील चंद्रभागा बसस्थानकाच्या विस्तीर्ण मैदानात सोमवारी शिवसेनेची भव्य महासभा झाली. ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा देत या सभेला राज्याच्या विविध भागांतून शिवसैनिक उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की बाबरी मशीद पाडल्याला 28 ते 30 वर्षे झाली. अजूनही बाबरी पतनाचा खटला चालू आहे. हिंदू लोक कोर्टात खेटे घालत आहेत. त्यानंतरच्या सोहराबुद्दीन खटल्याचा निकाल लागला. यांच्या सोयीच्या केसेस निकालात काढून घेतल्या जात आहे. मग बाबरी खटल्यातील केसेसचा निकाल का लागत नाही? निवडणूक आली, की यांच्या अंगात राम मंदिराचे भूत येते. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणून मंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिले जाते. शिवसेना आता  राम मंदिर बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या देशातील हिंदू  आता पेटून उठलेला आहे. कूंभकर्ण जरी झोपला असला तरी हिंदू जागा झालेला असून मंदिर बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुंभकर्णा वेळीच जागा हो नाही तर पेटलेला हिंदू जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देऊन उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, बिहारमध्ये जागा वाटप यशस्वी झाले म्हणून भाजपवाले खूश आहेत. मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व पक्षांनी राममंदिराबाबतची आपली भुमिका स्पष्ट करावी. शिवसेनेने राममंदिराबाबत उघड भुमिका घेतली. खुले आव्हान आहे की एन.डी.ए.तील किती घटकपक्ष राममंदिराच्या बाजूने आहेत हे उघड व्हावं. कोण- कोणता पक्ष राममंदिराच्या बाजूने आहे हे एकदा जाहीर करावे असे आव्हान देऊन ठाकरे पुढे म्हणाले की, हे नितीशकुमार आर.एस.एस.मुक्त भारताची भाषा करीत होते. नितीशकुमार, रामविलास पासवान यांची राम मंदिराविषयीची भुमिका काय आहे हे जाहीर करावे असे आवाहन यावेळी ठाकरे यांनी केले. 

राफेल मुद्याला हात घालताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राफेल विमान खरेदीत घोटाळा झाला असल्याचा समज आहे. न्यायालयाने क्लीन चिट दिली कशी दिली काय माहिती नाही. ज्या राफेलचे काम अनूभव नसलेल्या कंपनीला दिले. ज्या सैन्यासाठी विमाने खरेदी केली त्यात घोटाळा होतो आणि त्याच सैनिकांना पगार वाढ मात्र नाकारली जाते. शस्त्र खरेदीत घोटाळा, पिक विम्यामध्येही घोटाळा झाल्याचा आरोप होतोय.  शेतकरी दुष्काळाने हैराण झाला आहे. कांद्याला भाव नाही, मुगाला भाव नाही,  पिकविम्याची नुकसानभरपाई नाही, कर्जमाफी मिळाली म्हणून कुणीही भेटत नाही. 32 हजार कोटींची कर्जमाफी कुणाला दिली अशी विचारणा करून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी,  सैनिकांना पगारासाठी न्याय मागणे जर गुन्हा असेल तर आम्ही गुन्हा करू असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

फक्त आम्हीच जगज्जेते असल्याचा समज यांनी निर्माण केला होता. मात्र 5 राज्यातील जनतेने या समजाच्या ठिकर्‍या उडवल्या. 5 राज्यांत यांचा सुपडा साफ झाला. मिझोराम, तेलंगणासारख्या राज्यांनी प्रादेशिक पक्षांना निवडूण देताना राष्ट्रीय पक्षांना नाकारले आहे. या राज्यातील जनतेचे अभिनंदनच केले पाहिजे. माझ्या घरात राष्ट्रीय पक्षांची मस्ती चालू देणार नाही, पर्याय नसला तरीही जनतेने यांना नाकारले आहे. अगोदर घरातील घाण साफ करू म्हणून या राज्यांनी भाजपला दूर केल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.  आगामी निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे सरकार आले तर राममंदिर तर बांधूच, पण धनगर समाज, महादेव कोळी समाज, त्याचबरोबर ज्या-ज्या सामाजिक प्रश्‍नांची मागणी आहे ते प्रश्‍न सोडवण्याचे वचन मी देतो. शिवसेनेची प्रत्येक शाखा शेतकर्‍यांसाठी मदत केंद्र झाली पाहिजे. जानेवारी महिन्यात मी दुष्काळी भागात फिरणार आहे. शेतकर्‍यांच्या पाठिशी शिवसेना उभा राहणार आहे. 

प्रारंभी प्रास्ताविक शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, दुष्काळी भागातील जिराईत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये, बागायती हेक्टरी 1 लाख रुपयांची अर्थिक मदत, शेतकर्‍यांच्या मुलांची सर्व शैक्षणिक फी 3 वर्षांकरिता माफ करावी, चारा, पाणी जनावरांना पूरवण्यात यावे, ठिबक सिंचनसाठी 100 टक्के अनुदान द्यावे, नदी जोड प्रकल्प राबवण्यात यावा आदी मागण्या केल्या. यावेळी  रश्मीताई ठाकरे, अदित्य ठाकरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खा. चंद्रकांत खैरे, खा. संजय राऊत, ना. एकनाथ शिंदे, खा. विनायक राऊत, ना. अर्जून खोतकर, आ. निलम गोर्‍हे, राज्यमंत्री दादा भुसे, खा. अनिल देसाई, आ. नारायण पाटील,  यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा  समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत, प्रमूख संभाजीराजे शिंदे, गणेश वानकर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, राज्याच्या सर्वदूर भागातून आलेले दोन लाखांवर शिवसैनिक उपस्थित होते. सुत्रसंचालन  आदेश बांदेकर यांनी केले तर राष्ट्रगीताने महासभेची सांगता झाली.