Sat, Jul 04, 2020 10:32होमपेज › Solapur › वैष्णवांच्या मांदियाळीविनाच आज आषाढी एकादशी सोहळा

वैष्णवांच्या मांदियाळीविनाच आज आषाढी एकादशी सोहळा

Last Updated: Jul 02 2020 8:01AM
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवुनिया ॥1॥
तुळसी हार गळा कासे पितांबर ।
आवडे निरंतर तेचि रूप ॥

प्रतिवर्षी विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखोंच्या संख्येने येणार्‍या विठ्ठलभक्‍त वारकर्‍यांवर यंदा कोरोनाचे सावट असल्याने पंढरपुरात येण्यासाठी  बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे  इतिहासात यंदा प्रथमच वैष्णवांच्या मांदियाळीविनाच आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी यात्रा न भरवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र पालखीची परंपरा जपण्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या नऊ मानाच्या पालख्या बसने दशमीला म्हणजेच मंगळवारी रात्री 8 वाजता वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी मैदानावर दाखल झाल्या. येथे या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले. पंढरीतही रांगोळ्या रेखाटून उत्साहात स्वागत करण्यात आले. एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त 1 रोजी पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते शासकीय महापूजा झाली.

वाखरी पाळखी तळ येथे पालख्या दाखल होताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,  अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, नगराध्यक्षा साधना भोसले, वाखरीच्या सरपंच मथुराताई मदने, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच आषाढी यात्रा सोहळा न भरवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पंढरीत प्रथमत:च यात्रेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरीत सामसुम आहे. यातच कोरोनाचे नवे 7 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण संख्या 9 झाली आहे. शहरातील भक्तनिवास, प्रदक्षिणा मार्ग, जुनी पेठ, नवी पेठ, रुक्मिणीनगर याठिकाणी रुग्ण सापडल्याने प्रशासनापुढे एकप्रकारचे आव्हानच निर्माण झाले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा झाली. त्यांच्यासमवेत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळालेले मानाचे वारकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे हेदेखील सपत्नीक  पूजेसाठी उपस्थित होते.

दरम्यान, मानाच्या पालख्यांना स्नान करण्यास पहाटे पाच वाजल्यानंतर परवानगी देण्यात आली होती. आज एकादशीचा मुख्य सोहळा असल्याने त्यानिमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. 

पंढरपूर शहर व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने नागरिकांनी दर्शन व चंद्रभागेत स्नानासाठी विनाकारण गर्दी करू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महत्त्वाच्या व्यक्ती आणि मानाच्या पालखीप्रमुखांना प्रवेशपत्रिकेसह पादुकांबरोबर मंदिरात प्रवेश देण्यात आला.  पादुकांसमवेत स्थानिक 10 मठाधिपतींना नैवेद्य दाखवण्याचा मान मिळाला असून नैवेद्य दावण्यासाठी प्रत्येकी दोन मानकर्‍यांना प्रवेश देण्यात येणार आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वारीमध्ये कोरोनाचा संसर्ग उद्भवू नये म्हणून  महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त असून याकरिता 1500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्हींमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे.

आषाढी यात्रेनिमित्त 2 जुलैला सकाळपासून मानाच्या पालख्यांची विठ्ठल-रूक्मिणी मातेस भेटीचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर पालख्यांचे पंढरपूर येथून संबंधित संस्थानकडे प्रस्थान होणार आहेत. यात्रा यशस्वीरित्या पार पाहण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.