होमपेज › Solapur › तिसंगी तलाव कोरडाठाक

तिसंगी तलाव कोरडाठाक

Published On: May 17 2019 1:47AM | Last Updated: May 16 2019 10:17PM
पंढरपूर :  प्रतिनिधी

दरवर्षी 10 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवणार्‍या तब्बल 1 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या तिसंगी तलावात आजच्या घडीला 1 थेंबसुद्धा पाणी नसल्याचे विदारक दृश्य दिसून येत आहे. तलावच कोरडाठाक पडल्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो एकर क्षेत्रातील पिके जळून खाक झाली आहेत. शेतकर्‍यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले असून फळबागा जळाल्याने पुढची किमान 5 वर्षे तरी ते भरून निघणारे नाही, असे चित्र आहे. 

तिसंगी तलाव हा पंढरपूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील 10 गावांतील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.  वीर-भाटघर धरणाच्या अतिरिक्त पाण्यातून दरवर्षी हा तलाव भरून घेतला जातो. सुमारे 1 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या तलावावर तिसंगी, सोनके, वाखरी, गादेगाव, उपरी, भंडिशेगाव, पळशी, खेडभाळवणी, शेळवे, कौठाळी या गावातील 4 हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवठा केला जातो. तलाव शंभर टक्के भरल्यानंतर वर्षभरात पाण्याच्या किमान 3 पाळ्या मिळतात आणि तेवढ्या पाण्यावर या तलावाच्या लाभक्षेत्रातील शेती चांगली फुलते. मागील 80 वर्षांपासून या तलावाच्या जोरावरच या 10 गावांतील शेतकरी समृद्ध झालेले आहेत. मात्र, गेल्या वर्षी नीरा-उजवा कालवा विभागाने अतिशय ढिसाळ कारभार केला आणि वेळेतच तिसंगी तलावात पाणी भरले नाही. शेतकर्‍यांना आंदोलने करावी लागल्यानंतर 25 टक्के तलाव भरून घेतला गेला. त्या पाण्यावर लाभक्षेत्रातील शेतीसाठी पाण्याचे केवळ 1 आवर्तन सोडण्यात आले.   

तेवढ्या पाण्यावर शेतकर्‍यांना केवळ जनावरांसाठी लागणारा चारा थोड्याफार प्रमाणात घेता आला. त्याशिवाय इतर पिके घेणे तर बाजूलाच, आज शेतकर्‍यांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तलावाच्या लाभक्षेत्रातील गादेगाव, वाखरी, भंडिशेगाव, उपरी या गावांतून पाण्यासाठी टँकरची मागणी जोर धरू लागली आहे. वाखरी गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरला मंजुरी मिळाली आहे. 

आजवर दुष्काळात अनेकवेळा तिसंगी तलाव कोरडा पडल्याचे बुजूर्ग मंडळी सांगत आहेत.  मात्र, आजच्या एवढी भयाण परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. आज या तलावामध्ये पाण्याचा एक थेंबही नजरेस पडत नाही. तलावाच्या काठावर आणि पोटात पसरलेली हिरवीगार शेती आता कोमेजून गेली आहे.  गत चार महिन्यांत वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे तसेच बेकायदेशीर उपसा केल्यामुळे तलावातील संपूर्ण पाणीसाठा मे महिना उजाडण्यापूर्वीच संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे तलावाच्या लाभक्षेत्रात असलेली दूरची गावे तर जानेवारीमध्येच पाण्याअभावी सैरभैर झालेली आहेत. तलावाची निर्मिती झाल्यानंतर  पहिल्यांदाच तलावाच्या उशास बसलेल्या तिसंगी आणि पायथ्याला असलेल्या सोनके गावातीलही  पिके आता जळू लागली आहेत. पाण्यासाठी या गावांमध्येही जून अखेर पाऊस नाही आला तर टँकर सुरू करावे लागतील, अशी परिस्थीती आहे. 

या परिसरात केळी, डाळींब, चिकू, बोर अशा फळबागा आहेत. तसेच लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक  घेतले जाते. मात्र, आता पाण्याअभावी शेतकर्‍यांनी उसाची लावण केलीच नाही. केळी, डाळींब, बोरीच्या बागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. त्या तोडून काढण्याशिवाय आता शेतकर्‍यांपुढे पर्यायच उरलेला नाही. 

शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे 

आता दुष्काळात जरी सरकारने काही आर्थिक मदत केली तरी ती तात्पुरत्या स्वरूपात असणार असून शेतकर्‍यांचे पुढील किमान 5 वर्षांचे मोठे नुकसान झालेले आहे. यावर्षी तरी पाऊस पडावा, तलाव पूर्ण क्षमतेने भरावा आणि पुढच्या वर्षी शेतीला हातभार लागावा अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे आणि येणार्‍या पावसाळ्याकडे लागलेल्या आहेत.