Sun, Oct 20, 2019 06:33होमपेज › Solapur › मोहोळमध्ये खिसेकापूंची टोळी जेरबंद

मोहोळमध्ये खिसेकापूंची टोळी जेरबंद

Published On: Jul 12 2019 8:57PM | Last Updated: Jul 12 2019 8:54PM
मोहोळ : वार्ताहर

आषाढी वारीच्या गर्दीचा फायदा घेवून बसस्थानकात चोऱ्या करणारी टोळी शुक्रवारी मोहोळ पोलिसांनी गजाआड केली. या टोळीत दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एका कारसह सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शिवाजी सुभाष घोलप, राजेंद्र विद्याधर नितळे, बिबी नंदा इंद्रजीत कसबे, ज्योती जितेश सकट (सर्व रा. जागजी ता. मुरुड जि. लातूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी १२ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने पंढरपूरला जाण्यासाठी मोहोळच्या बस स्थानकात मोठी गर्दी होती. यावेळी दोन पुरुष व दोन महिला प्रवाशांची चोरी करण्याच्या उद्देशाने गर्दीत फिरत होते. यावेळी सदर ठिकाणी पॅट्रोलिंग करणाऱ्या डी.बी पथकाला त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी चौघांचीही चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून सात महागडे मोबाईल, रोख रक्कम व चोरीची इंडिका कार मिळून आली. 

पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक मीना मरे, पो.ना. निलेश देशमुख, शरद ढावरे,अभिजीत गाटे, गणेश दळवी, विजय माने, म.पो.कॉ. सविता आयरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात वरील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.