Tue, Jul 07, 2020 20:45होमपेज › Solapur › उस्मानाबादचा खासदार आज दुपारपर्यंत ठरणार

उस्मानाबादचा खासदार आज दुपारपर्यंत ठरणार

Published On: May 23 2019 1:44AM | Last Updated: May 22 2019 10:59PM
उस्मानाबाद ः प्रतिनिधी

जिल्ह्याचे नवीन खासदार कोण याची उत्सुकता गुरुवार, 23 रोजी दुपारपर्यंत संपणार आहे. राणाजगजितसिंह पाटील की ओमप्रकाश राजेनिंबाळकर लोकसभेत पोहोचणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तुळजापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत सकाळी आठला मतमोजणी सुरू होणार आहे. प्रशासनासह पोलिसांनीही मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. आज मतमोजणीचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अधिक सतर्क होत बंदोबस्तात वाढ केली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर साध्या वेशातील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात केला आहे. 

18 एप्रिल रोजी मतदान झाले होते. यावेळी विद्यमान खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने गायकवाड समर्थकांत नाराजी होती. अखेरच्या टप्प्यात गायकवाड गटाने राष्ट्रवादीला छुपा, तर शेवटच्या दिवशी उघड पाठबळ दिले. या डॅमेज कंट्रोलसाठी जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे उमरगा, लोहारा तालुक्यांत ठाण मांडून होते. दुसरीकडे राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. यंदा काँग्रेसनेही राष्ट्रवादीला मनापासून साथ दिल्याचा विश्‍वास कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे विजय आमचाच होणार, असा दावा दोन्ही उमेदवारांचे समर्थक करीत आहेत. गेला महिन्याभर यावरच चर्वितचर्वण झाले. अनेकांनी पैजाही लावल्या आहेत. या सर्वांची महिन्याभराची उत्कंठा शिगेला पोचली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आता नवीन खासदाराचे नावच जाहीर होणार असल्याने दोन्ही बाजूंकडील कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे.