Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Solapur › सोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग

सोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 6:37PMसोलापूर : संतोष आचलारे

सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही केल्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. कामाच्या नादात अनेकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. जागोजागी खड्डेच खड्डे पडले असून बोरामणीनजीक सुरू करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाजवळ तर अत्यंत धोकादायक अरूंद रस्ता असल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे महामार्ग चक्‍क मृत्यूचा महामार्ग बनल्याचे दिसत आहे. 

सोलापूर-पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असतानाच सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील तीन वर्षांत या कामाची कोणतीच प्रगती नसून काम करणार्‍या ठेकेदाराची सातत्याने अदलाबदली होत असल्याने महामार्गाच्या कामाची अक्षरश: वाट लागली आहे. 

सुरुवातीपासून सोलापूर ते तांदूळवाडीपर्यंतच्या 20 किलोमीटरला ‘मौत का मार्ग’ असे संबोधण्यात येते. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्याने हा मार्ग सर्वांच्या सुरक्षेसाठी उपयुक्‍त ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र गत तीन वर्षांत अत्यंत निकृष्ट असे काम याठिकाणी होत असून कामाच्या नादात मूळ रस्त्याचाच बट्ट्याबोळ झाल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्‍त होत आहे. 

सोलापूर मार्केट यार्डपासून नवीन हैदराबाद जकात नाक्यापर्यंत तर अजून अपेक्षित रस्त्यावरील अतिक्रमणेही काढण्यात आली नाहीत. त्यामुळे हा रस्ता नेमका होणार तरी कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जकात नाक्याच्या पुढे तांदूळवाडीपर्यंत चौपरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र हे काम अपेक्षित गतीने व अपेक्षित गुणवत्तेचे नसल्याचे दिसून येत आहे. 

पावसामुळे महामार्गावरील सर्व डांबरीकरणाचे सपाटीकरण झाले आहे. त्यामुळे जागोजागी खड्डेच खड्डे पडले गेले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे पावसाच्या पाण्यात झाकले जात असल्याने वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे महामार्ग आहे असे समजून वेगात असणार्‍या वाहनचालकांचा अचानक ताबा सुटत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीस्वारांची तर प्रचंड कसरत होत असून एक दिवसाआड सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. 

बोरामणीनजिक असणार्‍या जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. मात्र यासाठी चांगला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्यात आला नाही. पुलानजिक असलेल्या अपुर्‍या रस्त्यावर प्रचंड खड्डे व पाणी असल्याने याठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गत महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र पावसाच्या सातत्याने हे काम रेंगाळले गेले आहे. यात वाहनधारकांच्या जीवास मात्र मोठा धोका निर्माण झाला आहे. 

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराची सातत्याने अंतर्गत अदलाबदली होत असल्याने  काम संथगतीने व गुणवत्ताहीन होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीच येथील परिस्थितीची पाहणी करुन ठेकेदारास तातडीने तात्पुरत्या तरी सुरक्षित उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.