Mon, Jun 25, 2018 11:23होमपेज › Solapur › अवैध अर्जांवर 18 जूनला निर्णय 

अवैध अर्जांवर 18 जूनला निर्णय 

Published On: Jun 14 2018 10:37PM | Last Updated: Jun 14 2018 10:05PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून सात माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अवैध ठरविले होते. त्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाद मागितली होती. त्यावर आज, 14 जून रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी झाली असून यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सुनावणी पूर्ण केली असली तरी यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. यावर जिल्हाधिकारी येत्या 18 जून रोजी आपला अंतिम निर्णय देणार आहेत. 19 जूनला अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निकाल बाजूने लागणार की विरोधात जाणार यामुळे अवैध अर्ज ठरविलेले उमेदवार आता चांगलेच धास्तावले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतरच या संचालकांचे भवितव्य ठरणार आहे.

बाजार समितीचे माजी संचालक चेअरमन दिलीप माने, इंदुमती अलगोंडा, अशेाक देवकते, अविनाश मार्तंडे यांच्यासह काहींचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील  यांनी अवैध ठरविले होते. त्यावर या उमेदवारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपील दाखल केले होते. त्यावर आज सुनावणी पूर्ण केली; मात्र निर्णय राखून ठेवला आहे.