Mon, Sep 16, 2019 06:23होमपेज › Solapur › 28 दिवसांत जिल्ह्यातील सहा लाचखोरांना अटक

28 दिवसांत जिल्ह्यातील सहा लाचखोरांना अटक

Published On: Mar 04 2019 1:06AM | Last Updated: Mar 03 2019 8:12PM
सोलापूर : धनंजय मोरे

गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात शहरासह जिल्ह्यातील  6 लाचखोरांना सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यामध्ये तहसील ऑफिसचे-4, महानगरपालिका-1 आणि ग्रामपंचायत सदस्य-1 यांचा समावेश आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा वर्षातून एकदा सप्ताह असतो. या सप्‍ताहामध्ये विविध शाळा-महाविद्यालयातून भाषणे, फलक लावणे, रॅली काढणे असे गाड्यांना स्टिकर लावणे असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. जनजागृती करूनही लाच घेण्याच्या प्रमाणात मात्र वाढच होत आहे.

4 फेब्रुवारी रोजी भूसंपादन विभागातील  नायब तहसीलदार नरसिंह एकनाथ कुलकर्णी याच्या सांगण्यावरून लिपीक सलिम शेख याने तक्रारदाराकडून 500 रूपयांची लाच घेतली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी कुलकर्णी, शेख यांना रंगेहाथ पकडले होते. यात विशेष म्हणजे कुलकर्णी हा सेवानिवृत्त झाला होता. त्याला   पुन्हा  मानधनावर कामास घेतले होते. याप्रकरणी सदर बझार पोलिसांत या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

4 फेब्रुवारी रोजी माळशिरस तहसील कार्यालयामधील कोतवाल पवन महादेव चंदनशिवे याच्या सांगण्यावरून मुकूंद बलभिम साठे याला 1 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. 13 फेब्रुवारी रोजी करमाळा तालुक्यातील साडे ग्रामपंचायत सदस्य दिनअहंमद शेख नुरमुलाणी याला 2 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर मुलाणीविरूध्द करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तसेच 25 फेब्रुवारी रोजी सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक नागेश शिवधर वेदपाठक  याला 500 रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर नागेश वेदपाठक याच्याविरूध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीच्या कारवायांमध्ये वाढ होत असली तरी लाच मागणार्‍यांच्या संख्येत अद्याप घट झालेली नाही. 

सक्षम मंजुरीनंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून लाचखोरांना पकडल्यानंतर पोलिस ठाण्यात लाच घेणार्‍याविरूध्द गुन्हा दाखल करतात. त्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले जाते. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्या लाचखोराची माहिती तो ज्या खात्यात कामाला आहे, त्या संबंधित खात्याला कळवितात. त्यानंतर त्या खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर (साधारण 1 महिन्याचा कालावधी)  त्या लाचखोराविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते.