होमपेज › Solapur › पंप नादुरुस्त, अचानक वीज खंडित  

पंप नादुरुस्त, अचानक वीज खंडित  

Published On: Apr 15 2018 1:26AM | Last Updated: Apr 15 2018 1:42AMसोलापूर:  प्रतिनिधी

पंप नादुरुस्त झाल्याने तसेच काही ठिकाणी वादळी वार्‍यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शनिवारी पूर्व भागात नियोजित वेळेपेक्षा पाणीपुरवठा सात-आठ तास उशीर झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

औज बंधारा गत आठवड्यात भरण्यापूर्वी शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा झाला. औज बंधारा भरल्यानंतर गत आठवड्याच्या शनिवारपासून पुन्हा नेहमीप्रमाणे तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. सध्या सर्वत्र अवकाळी पावसाचे वातावरण आहे. बुधवार तसेच गुरुवारी शहर परिसरात काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. यादरम्यान काही ठिकाणी वादळही झाल्याने तसेच अन्य कारणांमुळे 

त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. तीन दिवसांपूर्वी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रामधील पंप नादुरुस्त झाला. त्यानंतर पाकणी येथे अचानक वीजपुरवठा खंडित झाला. जवळपास सहा ते सात तास याठिकाणी वीज नव्हती. गुरुनानक पंपहाऊसमधीलदेखील असाच प्रकार घडला. 

परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. नियोजित वेळेपेक्षा अनेक तास उशिरा पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांचे हाल झाले. शनिवारी शहराच्या पूर्व भागातील अक्कलकोट रोड परिसरात सुमारे आठ तास उशिरा पाणी आले. महामानव डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशीच पाणी उशिरा आल्याने समाजबांधवांना त्रास सोसावा लागला. 

Tags :Pump unheeded, suddenly, disrupted power