होमपेज › Solapur › शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा उडणार धुरळा 

शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा उडणार धुरळा 

Published On: Apr 11 2019 2:12AM | Last Updated: Apr 11 2019 12:58AM
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होत असून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराचे शेवटचे सहा दिवस उरले आहेत. त्यामुळे आता प्रचाराचा राजकीय धुरळा उडणार आहे. भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीकडून त्यांच्या स्टार प्रचारकांसह उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून शेवटच्या टप्प्यात प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तसा प्रचार तापत असून सूर्यनारायण कोपलेल्या सोलापुरात प्रचारही तापल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे.

गेल्या अनेक निवडणुकांनंतर सोलापुरात लोकसभेसाठी तुल्यबळ अशी तिरंगी लढत  होत आहे. भाजपकडून शिवाचार्य महास्वामी, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुशीलकुमार शिंदे असे उमेदवार सोलापूरच्या रिंगणात आहेत. तीन पक्षांपैकी भाजप वगळता उर्वरित दोन्ही उमेदवार महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला परिचित असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्याचे सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा प्रचारात सहभाग आहे. भाजपचे उमेदवार महास्वामी यांनीदेखील पदयात्रा, सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. सत्ताधारी भाजपकडून प्रचारात मोठा जोर लावला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर व अकोला या दोन लोकसभा मतदारसंघांतून यंदा आपली उमेदवारी दाखल केली आहे. वंचित आघाडीच्या महाराष्ट्रातील प्रचाराची धुरादेखील त्यांच्या खांद्यावर असल्याने आंबेडकर सोलापूर वगळता इतरही मतदारसंघांत प्रचारासाठी दौरे करत आहेत. आंबेडकरी चळवळीतील संघटना, पक्ष यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिल्याने त्यांचा प्रचार जोमात सुरु आहे. ‘एमआयएम’चे खा. ओवेसी, ‘माकप’चे नरसय्या आडम यांनीही प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समविचारी महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिदे यांनी शेवटची निवडणूक विजयानेच करण्याचा चंग बांधला आहे. तशी त्यांनी सोलापूरकरांना भावनिक सादही घातली होती. त्याचा परिणाम कितपत पडतो, हे पाहावे लागेल. भाजपचे खासदार अपयशी ठरल्यामुळे सोलापुरात गतवेळी शिंदेंचा पराभव केल्याचे शल्य बरेचजण बोलून दाखवत आहेत. शिंदे यांनी पदयात्रा, जाहीर सभा, कॉर्नर सभा, घरोघरी भेटी यातून प्रचार  सुरु ठेवला असून त्यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यादेखील प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत.  शिंदे यांच्या विजयासाठी यंदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याने काँग्रेसच्या बरोबरीने राष्ट्रवादी प्रचारात आघाडीवर आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील- चाकूरकर, खा. ज्योतिरादित्य शिंदे, खा. कुमार केतकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सभा होत असून काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अभिनेत्री विजयाशांती प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राचे प्रचारप्रमुखपद असल्यामुळे शिंदेदेखील सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रचार दौर्‍यात सहभागी होत आहेत. त्यांच्या पश्‍चात त्यांचे निष्ठावंत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. एकूणच सोलापुरात तीनही राजकीय पक्षांनी प्रचाराची मुदत संपत आल्याने प्रचाराचा धुरळा उडवल्याचे चित्र आहे. सोलापूरसह या लोकसभा मतदारसंघातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.