Mon, Sep 16, 2019 05:36होमपेज › Solapur › जि.प. सभेत रंगले राजकीय नाट्य

जि.प. सभेत रंगले राजकीय नाट्य

Published On: Dec 28 2018 1:17AM | Last Updated: Dec 27 2018 11:44PM
सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही उपाययोजनेवर चर्चा कमी आणि एकमेकांचे वाभाडे काढण्यातच जि. प. पदाधिकारी आणि सदस्य दंग असल्याचे गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिसून आले. दरम्यान, या राजकीय नाट्यात ब्लेझर, महिला व बालकल्याणच्या योजनेसह दुष्काळावरून सदस्य व पदाधिकार्‍यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.

दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेचे एकही काम चालू नाही. त्यामुळे नागरिकांना काम दिले पाहिजे. ज्याठिकाणी पाण्याची समस्या आहे, त्याठिकाणी पाणी व चार्‍याची सोय करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी घसा कोरडा करुन सांगितले तरी दुष्काळी उपाययोजनेबाबत कोणताही ठोस ठराव करण्यात येत नसल्याची ओरड सदस्यांमधून झाली.

 सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, वित्त व लेखा अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्यामध्ये रोजगार हमीची कामे काहीच चालू नाहीत, ही खूपच दुर्दैवाची बाब असल्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी सांगितले. 

रोजगार हमीमधून अनेक कामे असून यासाठी शासन अगणित निधी द्यायला तयार असताना कामे का चालू नाहीत? या प्रश्‍नावर मोहोळच्या सभापती समता गावडे म्हणाल्या, रोजगार हमीची कामे करायला अधिकारी तयार आहेत. मात्र मोहोळमध्येच एका कामाला लोकांनी तक्रार देवून काम बंद पाडले आहे. त्यामुळे मशीनने कामे करायची की लोकांकडून करायची. तसेच जनावरांच्या चार्‍यासाठी शासनाने एक कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मात्र या एक कोटी रूपयांचा काहीच फायदा जिल्हा परिषदेच्या सदस्यांना होणार नसल्याचे मत भारत शिंदे यांनी व्यक्त केले. कारण शासनाकडून जे मक्याचे बियाणे दिले जाते, ते म्हणजे 40 व 50 रूपयाला देते आणि आमच्याकडून मात्र 16 रूपयांनी घेतेे. हा कोणता न्याय आहे. सभापती तुम्ही फितूर आहात, असे म्हणल्यानंतर सभेमध्ये कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील व भारत आबा शिंदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. 

तत्पूर्वी सर्वसाधारण सभेपूर्वी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदस्य यांना मतदान यंत्राची माहिती प्रातांधिकारी शिवाजी जगताप व निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी दाखवून सभेला सुरूवात झाली. त्यानंतर विविध विषयावर पदाधिकारी व सदस्यांमध्ये बाचाबाची झाली.

पचंवीस वर्षांचे राजकारण इथे नको
महिला व बालकल्याणचे विषय चालू असताना महिलांना कोणत्या ठिकाणी कराटे प्रशिक्षण दिले जाते हे सदस्यांनाच माहिती नाही. तसेच समुपदेशन केंद्राबाबत अध्यक्ष संजय शिंदे व सदस्य त्रिभुवन धाईंजे यांच्यामध्ये बाचाबाची चालू असताना सदस्य शीतलादेवी पाटील यांनी सांगितले की, पंचवीस वर्षांचे राजकारण करायला आपण इथे जमलो नाही, तर महिलांचा प्रश्‍न गंभीर असून समोर बसणार्‍या पदाधिकार्‍यांनी अपेक्षित उत्तर द्यावे.