Sat, Jul 04, 2020 20:53होमपेज › Solapur › हेल्मेट नाही, पावती फाडायलेत, चला कलटी मारा

हेल्मेट नाही, पावती फाडायलेत, चला कलटी मारा

Last Updated: Nov 09 2019 2:05AM
सोलापूर ः प्रतिनिधी

हेल्मेट घातले नाही..समोर पावती फाडताहेत..चल रे..लवकर कलटी मार..अशीच भूमिका हेल्मेट न घालणार्‍या दुचाकीस्वारांकडून गुरुवारी रंगभवन परिसरातील समाजकल्याण केंद्रासमोर घेण्यात आली. वाहतूक पोलिसांना चुकविण्याच्या नादात चक्‍क चुकीच्या दिशेने पुन्हा वेगात वाहन चालविण्याचा दुसरा गुन्हा त्यांच्याकडून होत असल्याचेही दिसून आले.

पोलिस आयुक्‍त कार्यालयाकडून गेल्या तीन दिवसांपासून हेल्मेट नसणार्‍या दुचाकीस्वारांवर व सीटबेल्ट न घालणार्‍या कारधारकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या व वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवासस्थानासमोरच थांबलेल्या वाहतूक पोलिसांना चुकवून पळ काढणार्‍या दुचाकीस्वारांची संख्या यावेळी जास्त असल्याची दिसून आली. पोलिसांना चुकवून गतीने विरुध्द दिशेने वाहने चालविण्याच्या नादात याठिकाणी किरकोळ अपघात होण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली होती. रंगभवन परिसरातच हेल्मेट विक्री करण्याचा एक स्टॉलही होता. त्यामुळे पावती फाडण्यापेक्षा पाचशे रुपयांचे हेल्मेट खरेदी करण्यालाही काही दुचाकीस्वार पसंती देत असल्याचे दिसून येत होते.

पोलिसांनी पकडल्यानंतर काही शासकीय कर्मचारी हेल्मेट आहे; मात्र घरी विसरुन आलो, पुन्हा असे होणार नाही, असे सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कारवाई मोहीम सक्‍तीची करण्यापेक्षा सुरक्षेच्या जागृतीवर भर दिल्याने यास नागरिकांनीही प्रतिसाद दिला. मात्र, कारवाई होईल या भीतीने पळ काढणार्‍या दुचाकीस्वारांनी मात्र वेगळीच समस्या निर्माण करून ठेवली.