होमपेज › Solapur › सोलापूर : अपहरणप्रकरणी 'राष्‍ट्रवादी' नेत्याला अटक

सोलापूर: अपहरणप्रकरणी 'राष्‍ट्रवादी' नेत्याला अटक

Published On: Dec 24 2017 4:50PM | Last Updated: Dec 24 2017 6:16PM

बुकमार्क करा

नातेपुते : वार्ताहर 

पोलिस असल्याचा बहाणा करून जमीन हडपण्यासाठी युवकाचे अपहरण करणार्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाला पोलिसांनी अटक केली. दत्ता रावसाहेब मगर असे अटक केलेल्याचे नाव असून त्याने सहकांर्‍यांसह नातेपुते येथील राजू चंद्रकांत पवार (वय २८) याचे अपहरण केले होते. तसेच त्याची कोट्यवधी किमतीची जमीन हडपण्यासाठी त्याला मारहाण केली होती.  या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

राजू पवार याच्या मालकीची पुणे पंढरपूर मार्गावर हीरा ढाब्याजवळ अडीच एकर जमीन आहे. या जमिनीची करोडो रुपये किंमत आहे. ही जमीन हडपण्याच्या हेतूने अंकुश सुर्यवंशी व मल्‍हारी हुलगे यांनी प्रयत्‍न चालवले. त्यासाठी मगराचे निमगांव येथील पैलवान दत्ता मगर आणि सहकार्‍यांसह राजू पवार याच्या अपहरणाचा कट रचला.

या कटानुसार मगर याने सहकार्‍यांसह राजू पवारकडे जाऊन त्याला पोलिस असल्याचे सांगितले. त्याच्या नावाचे अटक वॉरंट आहे असा बनाव केला. पोलिस ठाण्यात न्यायचे आहे म्‍हणून राजू पवार याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला निमगांव येथील तालमीत नेऊन बेदम मारहाण केली. नंतर दहिवडी येथील ॲड. सावंत यांच्या पुढे सदर जमिनीची नोटरी करून घेतली. 

दरम्यान, राजूच्या कुटुंबीयांनी नातेपुते पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून तपासाची सूत्रे हालवली. मुख्य सूत्रधारांशी संपर्क साधला असता राजूला कातर खटाव ता. माण येथे सोडून दिले. त्यानंतर राजूने दिलेल्या जबाबावरून अंकुश सूर्यवंशी आणि मल्‍हारी हुलगे यांनी दत्ता मगर व सहकार्‍यांसह हा कट रचल्याचे निष्‍पन्न झाले. 

नातेपुते पोलिसांनी दत्ता मगर, योगेश शेटे (रा. दोघे निमगांव), अजमोद्दीन मुलाणी रा. नातेपुते या तिघांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार अंकुश सूर्यवंशी व मल्‍हारी हुलगे यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. 

महाराष्‍ट्र कुस्‍ती स्‍पर्धेच्या आखाड्यातून आरोपींना अटक

दत्ता मगर हा महाराष्‍ट्र केसरी कुस्‍ती स्‍पर्धेसाठी भूगांव ता. मुळशी जि. पुणे येथे होता. नातेपुते पोलिसांनी कुस्‍ती स्‍पर्धेच्या आखाड्यातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने त्याला अटक केली. मोठा राजकीय दबाव असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्यांतून समाधान व्यक्‍त होत आहे. 

माळशिरस तालुक्यात वाळू माफिया व भूमाफियांनी राजकीय वरदहस्‍त मिळवून थैमान घातले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्‍हेगारांचे धाबे दणाणले आहेत. 

आरोपींना पाच दिवसांची पोलिस कस्‍टडी

अपहरप्रकरणातील आरोपी राष्‍ट्रवादी काँग्रेसचा माजी युवा तालुकाध्यक्ष दत्ता मगर व योगेश शेटे यांना माळशिरस न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कस्‍टडी दिली आहे.