Mon, Sep 16, 2019 12:11होमपेज › Solapur › करमाळ्यातील दोन्ही खुनांचे रहस्य उलगडले

करमाळ्यातील दोन्ही खुनांचे रहस्य उलगडले

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:34PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात दोन वेगवेगळ्या खुनांच्या गुन्ह्यांत करमाळा पोलिसांनी कौशल्याचा वापर करून खुनाचा उलगडा केला आहे. दोन्ही गुन्ह्यांत संशयित आरोपींनी धक्‍कादायक कबुली दिली असून दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

टाकळी (ता. करमाळा) येथे घरासमोर झोपलेल्या तरुणाचा डोक्यात मोठा दगड घालून भावानेच भावाला ठार मारले आहे. सख्ख्या लहान भावानेच हा खून केल्याची कबुली दिली आहे. उमेश ज्ञानेश्‍वर गुळवे (वय 24, रा. मोरे वस्ती, टाकळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याला ठार मारणार्‍या संशयित आरोपीचे योगेश ज्ञानेश्‍वर गुळवे (वय 21, रा. टाकळी) असे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, हा उमेश गुळवे बुधवारी रात्री पावणेअकरा वाजता शेतातील घरासमोर अंगणात झोपला होता. यावेळी त्याचे आई, भाऊ हे परिसरात झोपले होते. पहाटे साडेचार वाजता मृताची आई अंगणात आली असता उमेशच्या भोवताली रक्‍त सांडल्याचे दिसल्याने तिने लहान मुलगा योगेश याला बोलावले. त्यावेळी योगेशने उमेशच्या अंगावरची व तोंडावरील रग (चादर) काढून पाहिले असता उमेश मृतावस्थेत असल्याने हा खून झाल्याचा प्रकार उघड झाला होता. उमेश याला अज्ञाताने हत्याराने डोक्यात घाव घालून जागीच संपवले होते. याची फिर्याद योगेश याने पोलिसांत दिली होती. मात्र पोलिसांच्या कुशल तपासाने या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मृत उमेश हा दारूचा व्यसनी होता. मागील एक वर्षापूर्वी शेतजमिनीतील एक एकर जमीन विक्री केली व आलेले पैसे  दारूच्या व्यसनात उधळले होते. याचा जाब विचारू नका अशी दमदाटीही घरी करत होता. एक वर्षापासून घरी आई, वडील आणि भावास सतत शिवीगाळ व मारहाण करीत होता. शिल्लक राहिलेली एक एकर जमीनही विकून पैसे पाहिजेत असा तगादा त्याने लावला होता. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांनी जमीन विकण्यास नकार दिल्याने त्याने दोघांनाही वायरने मारहाण केली होती. या सगळ्यांना घरातील सगळेच वैतागले होते. त्यामुळे (दि. 4) रात्री उमेश रोजच्याप्रमाणे दारू पिऊन आला व झोपला होता. त्यानंतर योगेशने पहाटे तीनच्या सुमारास डोक्यात दगड घालून उमेशचा खून केला. दगड घराच्या मागे कचर्‍यात लपवून ठेवला. मृतदेहावर पुन्हा पांघरुण घालून तो झोपी गेला होता. पहाटेच्या वेळी आईला जाग आल्यानंतर खून झाल्याचे लक्षात आले होते.

महिलेच्या खुनाची उकल
फॉरेस्ट येथे घडलेल्या दुसर्‍या  खुनाच्या गुन्ह्याचा अवघड तपास पोलिसांनी उघड केला. याप्रकरणी दिनकर हनुमंत गटकुळ (वय 24, रा. खानापूर, ता. परांडा) या संशयित आरोपीस अटक केली आहे.
खानापूर येथून करमाळा तालुक्यातील रोशेवाडी येथील फॉरेस्टमध्ये आणून चुलतीचा गळ्यातील स्कार्फच्या सहायाने गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. 

सात दिवसांपासून पडून राहिलेल्या महिलेच्या प्रेताची कसलीही ओळख पटत नसताना चोवीस तासांच्या आत आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. 
मागील तीन वर्षांपासून दिनकर आणि त्याची चुलत चुलती हिचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे ती दिनकर यास लग्न करू देत नव्हती, जर जमलेले तर लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत होती. कायम माझ्यासोबत असेच संबंध चालू ठेव नाहीतर तुझी तक्रार पोलिसांत करेल, अशी धमकीही देत होती. या सर्व प्रकारामुळे संशयित आरोपी दिनकर हा त्या महिलेस  1 एप्रिल रोजी परंड्याहून करमाळा येथे कामानिमित्ताने घेऊन आला. त्यानंतर तिला करमाळा रोशेवाडी रस्त्यापासून एक  कि.मी. अंतर आतमध्ये घेऊन गेला. याठिकाणी चेहर्‍यावर बांधण्याच्या स्कार्फने तिचा गळा आवळून खून केला. 
पोलिसांना महिलेचा मृतदेह 8 एप्रिल रोजी मिळून आाला होता. त्यानंतर पोलिसांनी तालुक्याच्या आसपासच्या भागात बेपत्ता महिलेची चौकशी केली. त्यात ती महिला परंड्याची असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे अधिक तपास केल्यानंतर ही महिला 1 एप्रिल रोजी संशयित दिनकर याच्यासोबत बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दिनकरची चौकशी केल्यानंतर दिनकरने सगळा घटनाक्रम पोलिसांसमोर कबूल केला आहे. 

या तपास कामात पोलिस निरीक्षक राजेश देवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल गोंधे, सहाय्यक पोलिस फौजदार कल्याण ढवणे, हवालदार विश्‍वास पवार, महंमद रफीक पटेल, पोलिस नाईक पर्वते, चेतन पाटील, अनिल निंबाळकर, दीपक भोसले, रविराज नागरगोजे, महेबूब शेख, सचिन जगताप यांनी काम पाहिले.