होमपेज › Solapur › महानगरपालिकेसमोर भीक मांगो आंदोलन

महानगरपालिकेसमोर भीक मांगो आंदोलन

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 9:17PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर संभाजी आरमार संघटनेच्यावतीने बुधवारी सकाळी भीक मांगो आंदोलन करण्यात आले. दिव्यांग कल्याणकारी निधीची विल्हेवाट लावली आहे. दिव्यांग निधीचा भ्रष्टाचार करणार्‍यांविरोधात फौजदारी कारवाई व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

दिव्यांगाकरिता राखीव असलेल्या महसुली उत्पन्नाच्या 3 टक्के निधीतून  निर्वाह भत्ता सुरु करावा, यापूर्वी दिव्यांग निधीचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महसुली उत्पन्नाच्या 3 टक्के इतका निधी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांकरिता खर्च करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सोलापूर मनपामध्ये 2011-12 ते 2016-17  या कालावधीमध्ये  या  निधीवर बोगस योजना दाखवून दिव्यांग निधी लंपास केला असल्याचा आरोप संभाजी आरमारच्यावतीने करण्यात आला आहे. 

यापूर्वी दिव्यांगांच्या निधीकरिता महापलिकेच्या प्रवेशद्वारासमोरच मुंडण आंदोलन केले होते. जोपर्यंत दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संभाजी आरमार रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, अशी  भूमिका घेण्यात आली आहे. श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन झाले.

 

Tags : solapur, solapur news, Sambhaji Aarmar Association, agitation, Solapur Municipal Corporation,