होमपेज › Solapur › प्रवासी भाडे घेऊन गेलेला चालक २३ दिवसांपासून बेपत्ता

प्रवासी भाडे घेऊन गेलेला चालक २३ दिवसांपासून बेपत्ता

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 10:18PMनळदुर्ग : प्रतिनिधी    

कारमधून प्रवासी भाडे घेऊन गेलेला वाहनचालक 23 दिवसांपासून बेपत्ता असून याप्रकरणी अपहरणाच्या संशयावरून नळदुर्ग पोलिसांनी यापूर्वीच एकास अटक केली होती. बुधवारी आणखी एका तरुणास  अटक करण्यात आली आहे. अजय व्यकंट राठोड (वय 24, रा. आलियाबाद, ता. तुळजापूर) असे बेपत्ता झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. निसार मोदीन जमादार, सलिम इलाही नदाफ (दोघे रा. सिंदगाव, ता. तुळजापूर) अशी संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणात गायब तरुणाचे अपहरण झाले की, घातपात असा प्रश्‍न उपस्थित होत असून, आरोपीला घेऊन नळदुर्ग पोलिसांचे एक पथक यापूर्वी तपासकामी कर्नाटकात गेले होते. नळदुर्ग पोलिस ठाणे हद्दीतील आलियाबाद या गावचा रहिवाशी अजय व्यंकट राठोड हा युवक आपल्या स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एयू 1507) पुणे येथे प्रवासी भाडे घेऊन चाललो म्हणून 22 मे रोजी घरातून गेला आहे. त्याला जाऊन 23 दिवस झाले तरी तो परत आला नाही. 

त्याच्याशी संपर्कही होत नसल्याने त्याचा भाऊ अविनाश व्यंकट राठोड याने नळदुर्ग पोलिस ठाण्यात शुक्रवार, 1 जून रोजी भावाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, 29 मे रोजी सोलापूर येथील घरकुल परिसरात अक्‍कलकोट रस्त्यावर सोलापूर पोलिसांना त्याची स्विफ्ट कार बेवारस अवस्थेत मिळून आली. नळदुर्ग पोलिसांनी ती कार ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून लावलेली आहे. मात्र अजय राठोड अद्याप बेपत्ता आहे.

पोलिसांनी सिंदगाव (ता. तुळजापूर) येथील निसार मोदीन जमादार या तरुणाला 6 जून रोजी, तर सलिम नदाफ यास बुधवार रोजी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक  संजीवन मिरकले हे करीत आहेत.