Mon, Sep 16, 2019 12:36होमपेज › Solapur › लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे बदलाच्या वाटेवर

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय समीकरणे बदलाच्या वाटेवर

Published On: Apr 22 2019 1:37AM | Last Updated: Apr 21 2019 11:17PM
मंगळवेढा:  प्रा. सचिन इंगळे

नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये मंगळवेढा तालुक्यात बर्‍याच राजकीय उलथापालथी झाल्याने ही निवडणूक मंगळवेढेकरांच्या लक्षात राहणारी ठरली आहे. 

मंगळवेढा तालुका हा पारंपरिक काँग्रेस-राष्ट्रवादी विचारसरणीचा तालुका म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ओळखला जातो. स्वर्गीय मारवाडी वकिलांनी ग्रामीण भागांमध्ये काँग्रेस विचारसरणी  मजबूत केली होती. तर शहरात स्वर्गीय रतिलाल शहा यांनी शरद पवार यांच्या विचारांची जपणूक केली होती. यामध्येच राष्ट्रवादीतून लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवेढा तालुक्यावर अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या बदलांमधून तालुक्याच्या राजकीय समीकरणातदेखील मोठे बदल पाहायला मिळाले. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणावर काम करणारी मंडळी या निवडणुकीमध्ये  भारतीय जनता पक्षासोबत गेल्याने तालुक्यातील लोकांना राजकारणाचे वेगळे रंग पाहायला मिळाले. 

यामध्ये परिचारक -ढोबळे -आवताडे यांच्यासह राष्ट्रवादीतील नाराज मोहिते - पाटील समर्थक गट हा भाजपच्या विचारधारेसोबत काम करीत होता. परिचारक यांच्यासोबत ढोबळे यांनी उमेदवार जय सिद्धेश्‍वर महास्वामी यांना सोबत घेत ग्रामीण भाग पिंजून काढला होता. 

काही दिवसांत सहकारातील मोठे नेते बबनराव आवताडे यांनी भारतीय जनता पक्षात थेट प्रवेश करीत आपल्या गटाला भारतीय जनता पक्षासोबत नेले. यामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष यांनी मोठी जबाबदारी पार पाडल्याची चर्चा तालुक्यात आहे. ज्या प्रा. ढोबळेंना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आवताडे यांनी धोबीपछाड दिला, त्याच ढोबळे यांच्या घरी आवताडे यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी जावे लागले. 

तर स्वर्गीय प्रदीप लाळे यांच्या कुटुंबाने  खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराबाबत रचना केली होती. ऐनवेळी समाधान आवताडे यांनी देखील आपला पाठिंबा भारतीय जनता पक्षाला जाहीर करीत कार्यकर्त्यांना कामाला लावले.

आता तालुक्यात परिचारक -ढोबळे -आवताडे हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत तर राष्ट्रवादीचा किल्ला हा राहुल शहा यांच्याकडे आहे. या निवडणुकीत शहा यांना भाजपचा प्रचार करण्याबाबत विचारणा झाली होती. मात्र, त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका सांगत पवार यांना सोडणार नसल्याचे जाहीर केले. काँग्रेसकडे आ. भारत भालके यांच्यापासून गेल्या काही वर्षांत बाजूला गेलेले शिवाजी काळुंगे, नंदकुमार पवार हे चेहरे काँग्रेससाठी एकदिलाने प्रयत्न करीत असल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेने सध्या शैला गोडसे यांच्या माध्यमातून तालुक्यात आपले काम उभे करण्याचे प्रयत्न केले. असे असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत गोडसे यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवित प्रचार केल्याने विधानसभेवर शिवसेनेचा हक्‍क अबाधित ठेवल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

आगामी विधानसभा  निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून आ.  भालके निश्‍चितपणे विधानसभेला सामोरे जाणार आहेत. मात्र, त्यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यापैकी कोण जागा लढवेल आणि कोण उमेदवार असेल याबाबत अजून स्पष्टता नाही.त्यामुळे लोकसभेला बदललेल्या राजकीय संदर्भातून भविष्यात कोणती समीकरणे तयार होणार आहेत, हे दिसून येते.