होमपेज › Solapur › मोहोळ बंदला शंभर टक्के प्रतिसाद 

मोहोळ बंदला शंभर टक्के प्रतिसाद 

Published On: Jan 03 2018 12:55PM | Last Updated: Jan 03 2018 12:55PM

बुकमार्क करा
मोहोळ : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथील विजयीस्तंभास मानवंदना देण्यास गेलेल्या भिमसैनिकांवर दगडफेक करणार्‍या समाजकंटकाचा निषेधार्थ मोहोळ शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी बांधवानी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन बंद पाळला. शाळा महाविद्यालय जरी सुरु असले तरी विद्यार्थ्यांची संख्या तुरळकच दिसत होती. 

मंगळवारीच सायंकाळी शहरातील व तालुक्यातील विविध पक्ष संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊन याबाबतचे निवेदन प्रशासनास दिले होते. यावेळी परिसरात महामार्गावर सोलापूर-कुर्डूवाडी बसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या. या बसच्या चाकांची हवा देखील सोडण्यात आली. त्यामुळे मोहोळ बस स्थानकांत एकही बस बाहेरुन आली नाही. मोहोळ येथील शिवाजी चौक, कुरुल रोड परिसर, पंढरपूर रोड, सिध्दार्थ नगर परिसरात पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून सर्व स्तरातील नागकरिकांना शांततेचे अवाहन केले. 

सकाळी साडे दहा वाजता मोटारसायकल रॅली काढून विविध संघटनांच्या वतीने शहरवासियांना बंद मध्ये सहभागी होण्याचे अवाहन केले. तर साडे अकरा वाजता सिध्दार्थ नगर परिसरातील हजारो नागरिकांनी मेन रोडने पायी रॅली काढून मोहोळ महसूल प्रशासनास निवेदन देऊन संबंधित दगडफेक करणार्‍या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणांनी तहसिल परिसर दणाणून सोडला.