Mon, Sep 16, 2019 11:45होमपेज › Solapur › खा. शरद बनसोडेंना पुन्हा तिकीट नाही?

खा. शरद बनसोडेंना पुन्हा तिकीट नाही?

Published On: Mar 01 2019 1:34AM | Last Updated: Mar 01 2019 1:34AM
सोलापूर : विशेष प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार बदलला जाणार असून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. राज्यातील पाच खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिली आहे. 

राज्यात सध्या भाजपचे 22 खासदार आहेत. त्यापैकी केवळ पाच खासदारांना घरी बसविले जाणार आहे. ज्या खासदारांना पुन्हा उमेदवारी नाही त्यांची निष्क्रियता व राजकीय गणिते लक्षात घेता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे. ज्यांचा पत्ता कट झाला आहे त्यामध्ये सोलापूरचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे, अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी, लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांच्यासह पुण्याचे अनिल शिरोळे व मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांचा समावेश असल्याची शक्यता सूत्राने  व्यक्त केली. सोमय्या यांना शिवसेनेचा असलेला विरोध पाहाता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. उवरित चौघांची निष्क्रियता पाहाता त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले.  2014 मध्ये देशात जोरदार मोदी लाट असल्याने हे खासदार निवडून आले होते. परंतु त्यांना मतदारांवर आपला प्रभाव निर्माण करता आला नाही. याबद्दल पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत. 2014 च्या निवडणुकीत 48 पैकी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेला 18 जागा जिंकता आल्या होत्या. पोटनिवडणुकीत भाजपला एक जागा गमवावी लागली होती. आता शिवसेना-भाजपची युती झाली असून दोन्हीही पक्ष लोकसभेसाठी ताकदीने कामाला लागले आहेत. सोलापुरात काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात स्थानिक जातीय समिकरणे लक्षात घेता उमेदवार देण्याची कसरत भाजपला करावी लागणार आहे.