Tue, Sep 17, 2019 04:37होमपेज › Solapur › लोकसभा निवडणुक : उस्मानाबादेत चक्क चारचाकी, बुलेटची लागलीय पैज!

उस्मानाबादेत कार,बुलेटची लागलीय पैज!

Published On: Apr 24 2019 1:42AM | Last Updated: Apr 24 2019 1:50AM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

थोडाथोडका नव्हे, तर तब्बल महिनाभर पोटतिडकीने प्रचार आणि तितक्याच चुरशीने लोकसभेसाठीचे मतदान झाले आहे. मतदान झालेल्या दुसर्‍या दिवसापासूनच मात्र समर्थक, कार्यकर्त्यांत आता पैजा लागू लागल्या आहेत. अशीच एक पैज उस्मानाबादकरांत चर्चेचा विषय ठरलीय. कार आणि बुलेट अशी दोन वाहनेच पैजेवर लागल्याने निवडणुकीतील चुरसही अधोरेखित झाली आहे.

घाटंग्री (ता. उस्मानाबाद) येथील जीवन शिंदे आणि हनुमंत ननवरे या दोघांत लागलेली पैज जिल्ह्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे. उस्मानाबादेत 18 तारखेला मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे दोघे रिंगणात आहेत. दोघांनीही शेवटच्या क्षणापर्यंत प्रभावी प्रचारयंत्रणा राबवली. त्यामुळे कार्यकर्त्यांतही चुरस आहे. कोण विजयी होईल, हे छातीठोक सांगणेही त्यामुळेच अवघड झाले आहे. सुरुवातीला आ. पाटील यांच्या बाजूने एकतर्फी भासणारी निवडणूक अंतिम टप्प्यात मात्र चुरशीचा साज लेऊन आली. त्यामुळेच आता कार्यकर्त्यांतही पैजा लागू लागल्या आहेत. जीवन शिंदे यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकरांच्या बाजूने, तर हनुमंत ननवरे यांनी राणाजगजितसिंहांच्या बाजूने पैज लावली आहे.

राणाजगजितसिंह पाटील विजयी झाले तर शिंदे यांच्या मालकीची बुलेट ननवरे यांना दिली जाणार आहे आणि राजेनिंबाळकर विजयी झाले तर ननवरे यांच्या मालकीची कार शिंदे यांना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हा करार नोटरी करुन घेतला आहे. 100 रुपयांच्या स्टँपवरच करारनामा झाल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex