Mon, Jul 13, 2020 08:17होमपेज › Solapur › माढा लोकसभा उमेदवारीचा निर्णय जाहीर करू : जयंत पाटील

माढा लोकसभा उमेदवारीचा निर्णय जाहीर करू : जयंत पाटील

Published On: Feb 01 2019 1:22AM | Last Updated: Jan 31 2019 10:58PM
फोंडशिरस : वार्ताहर

राज्यात व देशात मोदींच्या थापेबाजीला लोक कंटाळले आहेत. 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात छप्पर फाडके अशा खोट्या घोषणा दिल्या तरी जनता त्यावर विश्‍वास ठेवणार नाही. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या आठ दिवसांत निश्‍चितपणे जाहीर करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेनिमित्त जिल्हा आगमनाच्यावेळी नातेपुते येथील राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस रणवीरसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रदेश सरचिटणीस मोहन भोसले यांचे आगमन झाले. सोलापूर  जिल्ह्याच्या वतीने माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी सरपंच अमरशील देशमुख, तात्यासाहेब देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, डॉ. एम. पी. मोरे, अ‍ॅड. डी. एन. काळे यांनी स्वागत केले.

जयंत पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यातील दौरे पूर्ण होत आले आहेत. कोणत्याही मतदार संघात उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागण्यासाठी गर्दी आहे. मतदार संघातून कोणाला उमेदवारी देणार असे विचारले असता ते म्हणाले की,  अद्याप सुप्रिया सुळेंचीही उमेदवारीची घोषणा केलेली  नाही. त्यामुळे माढा लोकसभेच्या उमेदवाराचे नाव कसे जाहीर करू? येत्या 8 दिवसांत खा.शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून पहिली यादी निश्‍चिंतपणे जाहीर करू. त्यामुळे उमेदवारास प्रचारास भरपूर वेळ मिळेल.असे आ. पाटील म्हणाले.