Sat, Jul 04, 2020 19:38होमपेज › Solapur › माढ्याच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मीबाई राऊत बिनविरोध

माढ्याच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मीबाई राऊत बिनविरोध

Last Updated: Nov 09 2019 2:05AM
माढा ः तालुका प्रतिनिधी

माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी लक्ष्मीबाई धोंडिराम राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या माढ्याच्या तिसर्‍या उपनगराध्यक्ष ठरल्या आहेत. निवडीनंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

माढा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मिनल साठे यांनी, तर सहायक म्हणून मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी काम पाहिले. उपनगराध्यक्ष पदासाठी लक्ष्मीबाई राऊत यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर जाधव, तर अनुमोदक म्हणून माजी नगराध्यक्षा अनिता सातपुते यांच्या सह्या होत्या.

माढा नगरपंचायतीवर भाजपचे दादासाहेब साठे यांच्या गटाची सत्ता आहे. नगराध्यक्षपदी दादासाहेब साठे यांच्या पत्नी मिनल साठे या आहेत. साठे गटाचे सतरापैकी अकरा नगरसेवक निवडून आले आहेत. तर अपक्ष असलेल्या कल्पना जगदाळे यांचा साठे गटाला पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या झुंजारनाना भांगे गटाचे चार, तर काँग्रेसचे राजाभाऊ चवरे यांच्या गटाचा एक असे संख्याबळ आहे.

सर्व नगरसेवकांना पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न दादासाहेब साठे हे करत आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सुरुवातीला अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या पदावर अनुक्रमे अनिता सातपुते, राहुल लंकेश्‍वर व गंगाराम पवार यांना प्रत्येकी दहा महिने संधी देण्यात आली. त्यावेळी उपनगराध्यक्षा म्हणून मिनल साठे यांनी सलग अडीच वर्षे काम पाहिले. नंतरच्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने या पदावर मिनल साठे यांची वर्णी लागली. त्यानंतर त्यांच्यासोबत सुरुवातीला दहा महिने प्रभाकर जाधव यांची निवड करण्यात आली होती.

दहा महिन्यानंतर जाधव यांनी राजीनामा सादर केल्याने ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. माळी समाजाला पदाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी लक्ष्मीबाई राऊत यांची निवड करण्यात आली असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे. या निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नूतन उपनगराध्यक्षा लक्ष्मीबाई राऊत यांचा सत्कार दादासाहेब साठे यांच्यावतीने करण्यात आला. विरोधी पक्षनेते राजू गोटे यांनीही त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगराध्यक्षा मिनल साठे, कुर्मदासचे संचालक अजिनाथ माळी, शरद घोलप, शिवाजी जगदाळे, नगरसेविका अनिता सातपुते, सुप्रिया बंडगर, कल्पना जगदाळे, शीला खरात, वनिता शहाणे, नगरसेवक राहुल लंकेश्‍वर, गंगाराम पवार, प्रभाकर जाधव, राजू कुर्डे, अ‍ॅड. नागनाथ शिवपुजे, धोंडिराम राऊत, विजय सातपुते, आबा माळी, डॉ. हणुमंत क्षीरसागर, नितीन साठे, हणुमंत राऊत आदी उपस्थित होते.