होमपेज › Solapur › सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत रुचकर ‘दालचावल’ची भर 

सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत रुचकर ‘दालचावल’ची भर 

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 9:02PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

मुंबईत वडापाव, पुण्यात मिसळ, कोल्हापुरात भेळ आणि तांबडा रस्सा, नागपुरात संत्री, तर सीमावर्ती बेळगावात कुंदा, तर आपल्या अस्सल सोलापुरात कडक भाकरी, शेंगाचटणी अशी एक वेगळी खाद्य संस्कृतीची ओळख आहे. आता त्यात ‘दालचावल’ची चांगलीच भर पडली आहे. दहा रुपयात गरिबांना परवडणारा आणि श्रीमंतांना चाखण्याची भुरळ पडणारा मेन्यू बनला आहे. 

सोलापुरात पहिल्यादा फक्त मंगळवार बाजार येथील एका कोपर्‍यात आणि कृषी बाजार समितीत अर्थात यार्डात आणि काही मोजक्या ठिकाणी  मिळत होता. पण आज या ‘दालचावल’ ने खवय्यागिरांवर इतकी भुरळ पाडली आहे की आता शहर ज्या-ज्या बाजूने वाढत आहे, त्या-त्या ठिकाणीसुद्धा कब्जा मिळवला आहे. 

सोलापूर शहराचे नाक आणि जिल्ह्याचा गाभा समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी पाच-सहा ठिकाणी दालचावलचे स्टॉल आहेत. तर सात रस्ता,  मंगळवार बाजार, राजेंद्र चौक, हैदराबाद रोड, अक्कलकोट रोड, भैय्या चौक, मंगळवेढा रोडवरील देगाव शाळेसमोर, तिर्‍हे गावात अशा विविध छोट्या-मोठ्या ठिकाणी दालचावलचे स्टॉल्स आहेत. 
दालचावलची मागणी इतकी आहे की, स्टॉल्स, हातगाडी छोटी असते, मात्र त्या ठिकाणांहून विक्री होणारा दालचावल जादा असतो. तो घरीच तयार करुन मोठ्या वाहनात भरून विक्री ठिकाणी आणला जातो आणि जागेवरच एका गॅसवर गरम करुन ग्राहकांना दिला जातो. 

दाळ कँडमध्ये भरून विक्रीस्थळी आणून कुकरमध्ये सतत गरम करुन लागेल तेवढी विक्रीसाठी दुसर्‍या भांड्यात काढून ठेवली जाते. यातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे. 

स्टॉल्सची चढाओढ
कितीही कडकडून भूक लागली तरी  दहा रुपयात मिळणारे दोन प्लेट दालचावल घेतले की मोठा आधार मिळतो. जिल्ह्यासह शहरातून लोक कामानिमित्त घराबाहेर पडले आणि जेवणाची वेळ टळून गेली की वडापाव, भजी, भेळ, तेलकट स्नॅक्स खावून पोट बिघडण्यापेक्षा दालचावल घेऊन तृप्तीची ढेकर देणे पसंद करतात. याच प्रतिसादामुळे दावलचावलच्या स्टॉल्समध्ये चढाओढ होत आहे. मात्र ज्याठिकाणी दाळ (भाताबरोबर मिळणारी भाजी) ची भाजी चांगली मिळते, त्याच ठिकाणी गर्दी होते. 

या दालचावलच्या वाढत्या प्रतिसादामुळेच सोलापुरातून तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध तांदळाची मागणी होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजारासह छोट्या-मोठ्या घाऊक, किरकोळ दुकानातही तांदळाची मागणी वाढली आहे. बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी या तांदळाची आवक पाहूनच सोलापूर बाजार समिती आवारात तांदूळ महोत्सव भरवला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

पूर्वभागात ‘शेवबुंदी’  
सोलापुरात पूर्व भागाला वेगळे महत्त्व आहे. तेथील विविध उत्सवाबरोबर खाद्यसंस्कृतीचीही वेगळीच ओळख आहे. त्याठिकाणी शेवबुंदी या नाष्ट्यात घेतल्या जाणार्‍या मेन्यूची खूप चलती आहे. त्याबरोबर मिळणार्‍या भाजीची (चटणीची) वेगळीच चव आहे. ही शेवबुंदी फक्‍त पूर्व भागातच मिळते. तेथे गेले की अस्सल खवय्येगिरी हमखास शेवबुंदीची आर्डर देऊन  त्यांची चव चाखल्याशिवाय राहणार नाही.