Sat, Sep 21, 2019 06:28होमपेज › Solapur › मोहोळ येथे तरुणीवर अत्याचार करुन गर्भपात; दोघा विरोधात गुन्हा

मोहोळ येथे तरुणीवर अत्याचार करुन गर्भपात; दोघा विरोधात गुन्हा

Published On: Dec 27 2018 11:46AM | Last Updated: Dec 27 2018 11:45AM
मोहोळ : वार्ताहर

प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करुन तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून संबंधित तरूणीवर लैंगिक अत्याचार होत होते. या प्रकरणी मोहोळ पोलिसात एका तरुणासह त्याच्या चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानवाज हरुन इनामदार, मोहम्मद इनामदार (दोघे रा. मोहोळ) असे या चुलता पुतण्याची नावे आहेत. 

याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित २३ वर्षीय तरूणी पुणे येथील असून ती मोहोळ येथील एका विद्यालयात १० वीचे शिक्षण घेत होती. यावेळी मोहोळ शहरातील एका युवकाने तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर संबंधित युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. यात ही तरूणी गर्भवती झाली होती. मात्र सदर तरुणाने तिची समजूत काढून गर्भपात केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून तो तरुण तिच्याशी लग्न करण्यास नकार देऊ लागला होता. त्याच्या चुलत्या सह घरातील अन्य सदस्यांना या लग्नाला विरोध होता. याबाबत त्याने मोहोळ तहसील कार्यालयात सदर तरुणी सोबत लग्न करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र देखील लिहून दिले होते. त्यानंतर मात्र सदर तरुण तिला टाळू लागला. याचवेळी या तरुणाच्या चुलत्याने पीडित तरुणीस फोनवर सदर 'युवकाचा नाद सोड' असे सांगत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी सदर तरुणीने सोमवारी, रात्री उशीरा मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार शहानवाज हरुन इनामदार, मोहम्मद इनामदार (दोघे रा. मोहोळ) या चुलता पुतण्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.