Mon, Sep 16, 2019 12:28होमपेज › Solapur › ..तर मीही दिवाळी साजरी करणार नाही : महापौर

..तर मीही दिवाळी साजरी करणार नाही : महापौर

Published On: Nov 04 2018 1:18AM | Last Updated: Nov 03 2018 10:29PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या कर्मचार्‍यांना बोनस, सानुग्रह अनुदान द्या. हे कामगार जर दिवाळी साजरी करू शकणार नसतील तर मीही दिवाळी साजरी करणार नाही, अशा शब्दांत महापौर शोभा बनशेट्टी यांनी शनिवारी सकाळी आयुक्त अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन आपली आक्रमक भूमिका मांडली. गेल्यावर्षी एलबीटीचे राहिलेले पैसे व व जीएसटीचे अनुदानही मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिलेले आहे, याची आठवण करून देत बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी सूचनाही महापौरांनी आयुक्तांना केली. सकाळीच आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन महापौरांनी आपली व भाजपची भूमिका मांडली. 

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी बोनस आणि सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी आग्रही आहेत व आंदोलन करत आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून सत्ताधारी भाजपही याच भूमिकेत आहे. मात्र, प्रशासनप्रमुख तथा आयुक्त अविनाश ढाकणे यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती बोनस व सानुग्रह अनुदान देण्यायोग्य नाही, असे सांगत तरतुदी नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे कामगार संघटना व कर्मचारी संतप्त झालेले आहेत. या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात घेता महापौर शोभा बनशेट्टी यांनी शनिवारी सकाळी आयुक्तांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व कर्मचार्‍यांना बोनस तसेच सानुग्रह अनुदान द्यावा, अशी मागणी केली. मागील वर्षीपेक्षा यंदा महापालिकेची स्थिती सुधारली आहे तसेच शासनाचे विविध अनुदानही प्राप्त झाले आहेत, असे सांगून महापौरांनी कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सत्ताधारी आग्रही असल्याचे स्पष्ट केले. सायंकाळपर्यंत फेरविचार करुन निर्णय द्यावा, असेही त्यांनी सांगितले होते. कामगारांच्या सानुग्रह अनुदान व सण अ‍ॅडव्हान्ससंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कामगारांना जर दिवाळी साजरी करता आली नाही तर मी कशी दिवाळी साजरी करू, असा सवाल करत गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी एलबीटीचे राहिलेले पैसे व जीएसटीचे अनुदान मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिलेले आहे, त्याची आठवणही महापौरांनी या भेटीत आयुक्तांना करून दिली.