Fri, Jun 21, 2019 01:19होमपेज › Solapur › विमा पॉलिसीचे गाजर दाखवून सभासदांना लाखो रुपयांचा गंडा

विमा पॉलिसीचे गाजर दाखवून सभासदांना लाखो रुपयांचा गंडा

Published On: Apr 24 2019 1:42AM | Last Updated: Apr 23 2019 8:45PM
बार्शी : गणेश गोडसे 

धकाधकीचे जीवन, आजाराच्या प्रमाणात होत असलेली वाढ, रसायनयुक्त आहार, वाढते प्रदूषण आदी वेगवेगळ्या कारणांवरून सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य पॉलिसीचे गाजर दाखवत सभासदांना लाखो रुपयांना गंडा घातला जात असल्याचे बार्शी तालुक्यात दिसून येत आहे.

मेडिकल पॉलिसीच्या माध्यमातून ठेवीदाराकडून रोख रकमेच्या मुदत ठेवी स्वीकारून पॉलिसीची रक्कम दुप्पट देण्याचे व वैद्यकीय खर्च मोफत करण्याचे आमिष दाखवले जात आहे. पॉलिसी काढल्यानंतर कंपनीच्या नावाचे सदस्य प्रमाणपत्र सही शिक्क्यानिशी देऊन सदर सर्टिफिकेटवर मुदत संपल्यानंतर मूळ प्रमाणपत्र व पैसे भरल्याच्या पावत्या जमा करून घेऊन रक्कम न देता फसवणूक करण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

लुटण्याची साखळी पद्धत

बार्शी तालुक्यात साखळी पद्धतीने एकमेकांना गुंतवून घेत सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे  उकळण्याचा धंदा तेजीत आहे. सभासद गोळा करून अचानक बार्शी शहरातील कार्यालय बंद करण्यात  आल्यामुळे सभासद वर्ग व साखळी पद्धतीमध्ये काम करणारे सर्वजणच सैरभैर झाले आहेत.

आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच सभासद व एजंटांनी मुंबई येथील पॉलिसी कंपनीच्या मुख्य कार्यालयात धाव घेऊन पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबई येथील मुख्य कार्यालयही बंद करून पोबारा केल्याचे दिसत आहे. त्यामुळे हजारे रुपये गुंतवणूक केलेले सभासद भयभित झाले आहेत. आता आपल्या पैशाचे काय? आपले पैसे बुडणार की मिळणार? पैसे कोणाकडून मिळवायचे, यासाठी काय काय करावे? पैसे मागण्यासाठी कुठे जायचे? संचालकाला कुठे शोधायचे? संचालकांचा शोध लागलाच तरी पैसे देतील का? असे शेकडो प्रश्‍न सभासदांसमोर उभे राहिले आहेत.

याबाबत फसवणूक झालेल्या सभासदांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित पॉलिसी कंपनीच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.